बीड : विनायक मेटेंच्या राजकारणाची सुरूवात अन् शेवट 'मराठा समाज' | पुढारी

बीड : विनायक मेटेंच्या राजकारणाची सुरूवात अन् शेवट 'मराठा समाज'

बीड; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाच्या प्रश्‍नाबाबत आयोजित बैठकीसाठी विनायक मेटे शनिवारी (दि.13) रात्री मुंबईला जात होते. यावेळी झालेल्या भीषण अपघातात त्यांचे निधन झाले. मराठा समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी राजकारणात आलेल्या विनायक मेटे यांनी अखेरचा श्‍वास देखील समाजासाठीच घेतला. मराठा समाजाच्या प्रश्नावर लढा देणारे विनायक मेटे अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आले होते. वंचित-उपेक्षीत मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. पाच वेळा आमदारदेखील ते झाले.

राज्यातील शिंदे सरकारने मराठा समाजाच्या प्रश्‍नावर बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मेसेज मिळाला. यानंतर ते सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून बैठकीसाठी शनिवारी (दि.13) रात्री मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यावेळी झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मराठा समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी राजकारणात आलेल्या विनायक मेटे यांनी अखेरचा श्‍वास देखील समाजासाठीच घेतला.

तर घटना टळली असती

शनिवारी (दि.13) बीड येथे दिवसभर नियोजित कार्यक्रमात विनायक मेटे उपस्थित होते. बीड, अंबाजोगाई व ग्रामीण भागातील अनेक कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. रात्री बीडमध्येच मुक्काम असल्याने त्यांच्या चालकाने दिवसभर काम केले. दरम्यान अचानक मराठा समाजाच्या प्रश्‍नावर राज्य सरकारने आयोजित केलेल्या बैंकीचा निरोप आला. यामुळे त्यांना बीडमधील रविवारचे नियोजित कार्यक्रम रद्द करून रात्री तातडीने मुंबईकडे जावे लागले. मुंबई येथील बैठक नियोजित असती तर चालकाने दिवसा आराम केला असता. परंतु दिवसभर काम करून पुन्हा रात्री मुंबईकडे जावे लागल्यामुळे मेटे यांच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले असावे. तो निरोप आला नसता तर ही दुर्घटनाच घडली नसती, असे शिवसंग्रामचे कार्यकर्ते बोलत आहेत.

हेही वाचा :

Back to top button