जालना : विद्यार्थिनींच्या शिक्षणाला एसटीचा कोलदांडा; शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ | पुढारी

जालना : विद्यार्थिनींच्या शिक्षणाला एसटीचा कोलदांडा; शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : गाव खेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने शासनस्तरावरून विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्याचा एक भाग म्हणून विद्यार्थिनींना शहराच्या ठिकाणी ये-जा करणे सोयीचे व्हावे, या उदात्त हेतूने मानव विकास मिशनअंतर्गत एस. टी. सेवा पुरविण्यात आली. परंतु संबंधित विभागाच्या ढिसाळ, नियोजनामुळे अनेक विद्यार्थिनींना अर्ध्यावरच शिक्षण सोडण्याची दुर्दैवी वेळ आली. त्यातच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खेळखंडोबा झाला. त्यामुळे या सत्रात तरी विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित विभागानी मानव विकास मिशन बससेवेचे नियोजन करावे, अशी मागणी पालक व विद्यार्थिनींकडून होत आहे.

तालुका मुख्यालयापासून 20 ते 25 किमी अंतरावरून विद्यार्थिनी शहरात शिक्षणासाठी येतात. मानव विकास मिशन बससेवेमुळे अनेक पालकांनी मुलींचे शहरातील शाळेत नाव दाखल केले. विद्यार्थिनीही शाळेत शिक्षणासाठी ये-जा करू लागल्या. मात्र, कोरोना संकटात शाळा काहीकाळ बंद होत्या. त्यानंतर सुरू झाल्या. दरम्यान, एसटी कर्मचार्‍यांनी राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला. त्यामुळे बससेवा प्रभावित झाली होती. त्यानंतर एस.टी. कर्मचारी रुजू होऊ मुख्य मार्गावरून बससेवा सुरू झाली. मात्र, अजूनही मानव विकास मिशनच्या बसेस गाव खेड्यात पोहोचल्या नाही. त्यामुळे विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या दहावी व बारावी परीक्षेचे निकाल लागले असून, शाळा प्रवेशासाठी दररोज विद्यार्थिनींनी जात असतात. मात्र, वाहतुकीची सोय नसल्याने अनेक मुली सायकलवारी करीत शहर गाठत आहेत. बससेवा उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना बस सवलतीचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक शहराच्या ठिकाणी जाऊन किरकोळ कामे करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचा फायदा घेत गाव खेड्यात ऑटो व्यवसाय फोफावला आहे.

आपल्या मनर्जीने भाडे घेत असतात. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. तसेच भाडेसुद्धा दुपटीने घेत असल्याने गरजवंत बसेसअभावी खासगी वाहतुकीचा आसरा घेत आहेत. ग्रामीण भागातील प्रवाशांची लोकवाहिनी सध्या ग्रामीण भागात अजूनही सुरू झाली नसल्याने याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांनी लक्ष देऊन मानव विकास मिशन बससेवेचे तत्काळ नियोजन करावे, अशी मागणी पालक, विद्यार्थिनींकडून होत आहे.

प्रशासनाने दखल घ्यावी

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले होते. कोरोना काळात मानव विकासच्या गाव पातळीवर जाणार्‍या बसेस बंद झाल्या. त्यानंतर एस. टी. संपामुळे बसेस बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एस. टी. परिवहन विभागाचे धोरण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घातक ठरत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button