

ठाणे : पुढारी वृत्तसेवा
ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे ही घोषणा खरी करीत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंडखोरी करीत 50 आमदारांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीपासून फारकत घेतली. त्यामुळे राज्यासह ठाणे जिल्ह्यात कट्टर आणि सामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली होती. परंतु गुरुवारची संध्याकाळ ही ठाणेकरांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली आणि नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा होताच ठाण्यासह ठाणे जिल्ह्यात एकच जल्लोष सुरु झाला आहे. सर्व शिवसैनिकांसह सामान्य माणसांनीही फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल उधळत, पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या घराबाहेर तसेच शाखाशाखांमध्ये जल्लोष करण्यात आला.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 21 जूनला बंडखोरी करीत 50 आमदारांसह सुरत मार्गे आसाम गाठले आणि राज्यात भूकंप झाला. शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरून बंडखोर आमदारांचा निषेध करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांपासून शिवसैनिक नाराज झाले होते. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत फिरण्याचे आवाहन केले होते. माझ्यासमोर या, चर्चा करू आणि मार्ग काढू असे सातत्याने आव्हान करूनही बंडखोर आमदार हे महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार बनविण्याचा आग्रह धरत होता. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या घटनेमुळे शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांबाबत नाराजी पसरली. मात्र माजी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करताच एकच जल्लोष सुरु झाला. गोव्यातील बंडखोर आमदारांसह राज्यातील शिवसैनिकांनी जल्लोष केली. शेकडो शिवसैनिकांनी शिंदे यांच्या बंगल्याबाहेर फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव केला.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन केलेल्या बंडाला यश आले आहे. गुरुवारी भाजपाने शिंदे गटाला पाठींबा देऊन राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर उपमुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्याची बातमी डोंबिवलीत येऊन आदळताच शिंदे समर्थकांनी इंदिरा चौकात माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका रंजना पाटील, माजी नगरसेवक रवी पाटील, रणजित जोशी यांच्यासह समर्थकांनी फटाके फोडून ढोल-ताश्याच्या गजरात जल्लोष केला. पूर्वेकडील इंदिरा चौकात शिंदे समर्थकांनी एकच जल्लोष करत ढोल-ताश्याच्या गजरात नाचत आपला आनंद व्यक्त केला. यावेळी माजी नगरसेवक नितीन पाटील म्हणाले, ठाणे जिल्ह्याचा नेता राज्याचा मुख्यमंत्री बनला, याचा आम्हाला आनंद आहे. आता खर्या अर्थाने विकास काय असतो हे मुख्यमंत्री शिंदे जनतेला दाखवून देतील. यावेळी शिंदे समर्थकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.