उच्च न्यायालयाकडून चौकशी करा : अमरनाथ पणजीकर | पुढारी

उच्च न्यायालयाकडून चौकशी करा : अमरनाथ पणजीकर

पणजी,  पुढारी वृत्तसेवा :   भाजप सरकार इतिहासातील नोंदीत फेरफार करून तसेच काही महत्त्वांचे दस्तऐवज नष्ट करून देशात सर्वकाही 2014 नंतरच घडले असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करीत आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्यासह इतर ज्येष्ठ नेत्यांचे विधानसभा कामाकाजातील रेकॉर्ड नष्ट झाल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे, हे धक्कादायक आहे. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली नि:ष्पक्ष चौकशी करावी तसेच पोलिसांत एफआयआर नोंद करून कारवाई सुरू करावी अशी मागणी काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. यावेळी सरचिटणीस प्रदीप नाईक, प्रवक्ते अ‍ॅड. श्रीनिवास खलप व हळदोणा गट काँग्रेस अध्यक्ष आश्विन डिसोजा हजर होते. मुख्यमंत्र्यांच्या या गौप्यस्फोटामागे एक भयंकर षडयंत्र असल्याचा आम्हाला संशय आहे. हा एकंदर प्रकार म्हणजे भाऊसाहेब बांदोडकर, डॉ. जॅक सिक्वेरा आदीं नेत्यांच्या वैभवशाली कारकिर्दीचा वारसा पुसण्याचे कारस्थान आहे असा गंभीर आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.

मुख्यमंत्री विधानसभेचे सभापती असताना त्यांनी घटनात्मक महत्त्व असलेले रेकॉर्ड नष्ट झाल्याची माहिती सभागृहासमोर ठेवणे हे त्यांचे कर्तव्य होते. एवढी वर्षे गप्प राहून आता त्यावर भाष्य करण्याची मुख्यमंत्र्यांची कृती संशयास्पद आहे. त्यामुळे गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी ताबडतोब पोलिसांत तक्रार दाखल करून डॉ. प्रमोद सावंत यांचीही चौकशी करणे गरजेचे आहे, अशी आग्रही मागणी अ‍ॅड. श्रीनिवास खलप यांनी केली.

Back to top button