परभणी : पीकविमा भरणार्‍या शेतकर्‍याचे 40 हजार लंपास | पुढारी

परभणी : पीकविमा भरणार्‍या शेतकर्‍याचे 40 हजार लंपास

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : सध्या शेतीकामाची लगबग सुरू असून तालुक्यातील शेतकरी पीककर्जाची बाकी भरण्याकरिता बँकेत गर्दी करताना दिसत आहेत. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे सक्रिय झाले. गर्दीत तब्बल 40 हजार रुपये भरण्यासाठी आलेल्या शेतकर्‍याचे पैसे लंपास केल्याची घटना शहरातील नगर परिषदेनजीकच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत घडली आहे.

तालुक्यातील पुंगळा येथील शेतकरी परमेश्‍वर विश्‍वनाथ जगताप (35) हे आपले वडिल विश्‍वनाथ जगताप यांच्या नावावरील 40 हजारांचे पीककर्ज भरण्यासाठी आले होते. त्यांनी पँटच्या मागील खिशात 2 हजारांच्या 20 नोटा ठेवल्या होत्या. विचारपूस करण्यासाठी बँकेत गेले असता बँकेकडून त्यांना 10 तारखेनंतर पैसे भरा व सवलत मिळेल असे सांगण्यात आले. या चर्चे नंतर परमेश्‍वर जगताप हे बँकेबाहेर आले व समोरील गेट बाहेर थांबले असता त्यांना खिशात ठेवलेले 40 हजार  रुपये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांनी बँकेत धाव घेत आरडाओरड केली. पण लंपास केलेले पैसे मिळाले नाहीत. याप्रकरणी जिंतूर ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक दीपक दंतुलवार यांच्या मार्गदर्शनातखाली पोलिस तपास करीत आहेत.

सध्या शहरातील एसीबीआयच्या दोन्ही शाखेसमोर अन्य खातेदारांसह शेतकर्‍यांची गर्दी दिसत आहे. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे सक्रिय झाले. यावर्षी पीककर्ज हंगामपर्यत अपेक्षित होणारी गर्दी पाहता बँक व पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवावा अशी मागणी पुढे येत आहे.

Back to top button