केज तालुक्यात राजकीय पुढाऱ्याचा परितक्ता महिलेवर अत्याचार | पुढारी

केज तालुक्यात राजकीय पुढाऱ्याचा परितक्ता महिलेवर अत्याचार

केज : पुढारी वृत्तसेवा; केज तालुक्यात एका तथाकथीत राजकीय पुढाऱ्याने परितक्ता महिलेस नोकरी लावून लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २७ जून रोजी केज पोलीस ठाण्यात ३३ वर्षीय परितक्ता महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नवऱ्याशी मतभेद झाल्याने ती तिच्या ४ वर्ष वयाच्या मुलीसह आई वडिलांच्या सोबत माहेरी राहत आहे. नवरा-बायकोतील भांडण मिटवण्यासाठी ती एका राजकीय पुढाऱ्याकडे गेली होती. त्यांच्यातील भांडण मिटवण्यासाठी पुढाऱ्याने मध्यस्थी केली. तेव्हा पासुन त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. त्याने तिला नोकरी लावून देतो व तुझे नवऱ्यासोबतचे भांडण सोडवतो तसेच तुला नांदायला पाठवितो, असे आमिष पुढाऱ्याने दाखविले.

दरम्यान दि. ८ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ७:३० वा. च्या सुमारास कोव्हिड केंद्रावर कामाला जाण्यासाठी गावातील बस स्टँडवर पीडित महिला उभी असताना पुढाऱ्याने तिला अडवून पांढऱ्या रंगाच्या गाडीत ओढुन घेतले व तेथून घेऊन गेला. पीडितेचा विरोध असताना देखील त्याने तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक अत्याचार केला. यानंतर पीडितेला पुन्हा बसस्टँडजवळ आणून सोडले. या घटनेनंतर दोन वर्षापासून त्याने लग्न करतो असे आमिष देऊन तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केले. यातून ती पीडित महिला गरोदर राहिली. तिच्यासोबत लग्न करतो असे सांगून त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या खायला दिल्या. परंतु त्याने तिच्यासोबत लग्न केले नाही. लग्न करण्यासाठी तिने आग्रह केला असता तू खालच्या जातीची आहेस. तुझ्यासोबत मी लग्न करु शकत नाही. तसेच तू वयानेदेखील लहान आहेस. असे म्हणून पुढाऱ्याने लग्न करण्यासाठी टाळाटाळ केली.

तळेगावात धोकादायक खड्डयामुळे अपघातास आमंत्रण

पीडितेला मारहाण

पीडित महिलेने औषधे घेऊण देखिल गर्भपात न झाल्यामुळे तिला पुण्याच्या जिल्हा रुग्णालयात तिला दाखल केले होते. उपचारानंतर पुढारी तिला विष प्राशन करून आत्महत्या कर असे म्हणाला होता. यामुळे पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न देखिल केला होता. (दि.२७) रोजी पीडिता ही तिच्या आई-वडिलांसोबत घरी असताना सकाळी ६:०० ते ६:३० च्या सुमारास तो पुढारी, त्याची पत्नी, आई, नातेवाईक आणि एक अनोळखी महिला या पाच जणांनी पीडितेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तिचा मोबाईल व पर्स आणि त्यातील पैसे काढून घेतले. आणि तीला धमक्या दिल्या.

पीडितेने दि.२७ जून रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून त्या पुढाऱ्यासह पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी या पुढील तपास करीत आहेत.

पीडितेविरुद्ध लोकप्रतिनिधीची खंडणीची तक्रार

पीडित महिलेने तिचे कौटुंबिक भांडण मिटविण्याच्या बहाण्याने पुढाऱ्याशी जवळीक साधून २५ हजार घेतले. तसेच आतापर्यंत तिने २५ लाख घेतले आहेत. तिने बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच बदनामी टाळण्यासाठी आणखी १२ लाखांची मागणी केली. म्हणून एका लोकप्रतिनिधीने त्या पीडित परितक्ते विरूद्ध केज पोलीस ठाण्यात खंडणी आणि इतर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस जमादार राम यादव पुढील तपास करीत आहेत.

Back to top button