रेणापूर तालुक्यात पेरणीला सुरुवात | पुढारी

रेणापूर तालुक्यात पेरणीला सुरुवात

रेणापूर :  रेणापूर तालुक्यात मे महिन्यांच्या शेवटच्या तर जुनच्या दुसर्‍या आठवड्यात बेमोसमी पावसामुळे अनेक ठिकाणी विजा पडुन जनावरे दगावली तर आंबा व इतर फळबागांचेही मोठे नुकसान झाले. त्यानंतर 22 जुन पर्यंत तालुक्यात 73.4 मि.मि. पावसाची नोंद झाली पावसाच्या भरोशावर शेतकर्‍यांनी पेरण्या सुरु केल्या आहेत. तालुकात खरीपाचे पेरणी योग्य क्षेत्र 46 हजार 32 हेक्टर आहे. मागील वर्षाप्रमाणे या वर्षी सोयाबीनला बाजारात भाव नाही , त्यामुळे यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र घटण्याची शक्यता नाकारतायेत नाही. रासायनिक खते व बियाणांच्या किंमती वाढल्या आहेत. घरचेच बियाणे वापरा, असा कृषी खात्याचा सल्ला असल्यामुळेशेतकरी घरच्याच सोयाबीन बियाणांचा पेरणीसाठी वापर करताना दिसत आहेत. एकीकडे खरीप हंगामात पेरणीची अचूक वेळ साधली जाणे आणि बियाणांची चांगली उगवण होणे या गोष्टी शेतकर्‍यांसाठी महत्वाच्या असतात. पेरणी व्यवस्थित व वेळेवर होणे , बियाणांतून कोंब तरारून येणे हे शेतकर्‍यांनाहुरूप देणारी बाब असते. यासाठीच पेरणीची योग्य वेळ साधण्याकरीता शेतकर्‍यांचा आटापिटा असतो. तर दुसरीकडे पेरणीयोग्य(किमान 100 मि.मी.) पाऊस झाला तरच शेतकर्‍यांनी खरीपाची पेरणी करावी, असा कृषी खात्याचा सल्लाही शेतकर्‍यांसाठी तेवढाच महत्वाचा आहे.

खरीप हंगामापुर्वी शेतकरी शेतात उन्हात राबुन काडीकचरा वेचून जमिनीची मशागत करून जमीन भुसभुसीत करून ठेवतो. माती मुलायम झाल्यामुळे पावसाचे पाणी त्यात मुरते. अशा जमिनीवरील पेरणी बहुदा वाया जात नाही. अधिक उत्पादन देणारे बीयाणे , जमिनीत झालेला ओलावा व पावसाची अनुकुलता असल्यास पेरणी हा शेतकर्यांच्या जीवनातील एक आनंदी क्षण असतो. याच आनंदात शेतकर्यांच्या भविष्यातील आशादायक स्वप्ने सामावलेली असतात.पुर्वी वेळेवर पाऊस पडायचा. त्यामुळे शेतकर्‍यांना फारशी धाकधूक नसायची , बहुतांश शेतकर्‍यांकडे घरचेच बियाणे असायचे , पावसाचा लहरीपणा नसायचा, परंतु आता सर्वच चित्र बदलुन गेले आहे. महागडे बियाणे , गगनाला भिडलेल्या रासायनिक खतांच्या किंमती , मजुरांची टंचाई, पावसाचा लहरीपणा , निसर्गाचा बिघडलेला समतोल यामुळे शेतकर्‍यांसाठी पेरणी ही एक जोखमीची बाब झाली आहे. कधी- कधी अनुकुल परिस्थिती नसतांनाही शेतकर्‍यांना पेरणी करावी लागते. कधी पेर साधते तर कधी ती वाया जाते. पावसाच्या भरोशावरच शेतकर्‍यांची सर्व कदार असते. पाऊस परेल या आशेवर सध्या पेरण्या केल्या जात आहेत. लातूर जिल्ह्याची पर्जन्यछायेखाली असलेला प्रदेश म्हणून ओळख आहे. त्यात रेणापूर तालुक्याचे एक वेगळे वैशिष्टये आहे. गतवर्षी बर्‍यापैकी पाऊस झाला. त्यामुळे रेणा धरणासह रेणा नदीवरील बॅरेजेसमध्ये चांगला जलसाठा झाला तो आजही टिकून आहे. सध्या मान्सुनच्या पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. तालुक्यात पाच महसूल विभाग आहेत. त्यात 22 जून 2022 अखेर रेणापूर महसूल विभागात – 113 मि.मि., कारेपूर महसूल विभागात – 118 मि.मि., पानगाव महसूल विभागामध्ये – 81 मि.मि., पोहरेगाव मध्ये – 48 मि.मि. तर पळशी महसूल विभागात – 9 मि.मि. असा एकूण 73.4 मि.मि. पाऊस झाल्याची माहिती नायब तहसीलदार सुभाष कानडे यांनी दिली रेणापूर तालुक्यात अद्याप पेरणी योग्य (100 मि.मि.) पाऊस झाला नाही. शेतकर्‍यांनी पेरणीची घाई न करता पेरणी योग्य पाऊस झाल्यावरच खरीपाची पेरणी करावी , असा कृषी खात्याचा सल्ला असतांनाही शेतकर्‍यांनी चाड्यावर मूठ धरली आहे. पाऊस पडेल, या आशेवर शेतकर्‍यांनी पेरणीला प्रारंभ केला आहे. दुबार पेरणीचे संकट ओढावणार नाही, अशी वरुणराजाला विनवणी केली जात आहेत

Back to top button