इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंगचे 2 हजार 375 स्टेशन प्रस्तावित | पुढारी

इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंगचे 2 हजार 375 स्टेशन प्रस्तावित

धुळे, पुढारी वृत्तसेवा : पर्यावरणपूरक आणि पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात स्वीकारल्या जात आहे. या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहनधारकांना त्यांच्या
वाहनांच्या चार्जिंगची व्यवस्था सहजतेने उपलब्ध व्हावी, यासाठी महावितरणने राज्यात 13 ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन सुरू केले असून, राज्यातील विविध ठिकाणी 2,375 स्टेशन प्रस्तावित केले आहेत.

आतापर्यंत महावितरणने आपल्या उपकेंद्रातील अतिरिक्त जागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वखर्चाने चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन करून ठाण्यात 5, नवी मुंबई – 2, पुणे – 5 आणि नागपूर -1 अशी एकूण 13 चार्जिंग स्टेशन सुरू केले आहेत. सन 2025 पर्यंत राज्यातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पायाभूत सुविधा बृहन्मुंबई शहर- 1500, पुणे
शहर – 500, नागपूर शहर- 150, नाशिक शहर – 100, औरंगाबाद शहर -75, अमरावती -30, सोलापूर -20 अशी एकूण 2,375, तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई-नागपूर, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग मुंबई-पुणे, मुंबई- नाशिक, नाशिक- पुणे हे पूर्णत: इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधांनी सज्ज करण्यात येणार आहेत.

49 ठिकाणची कामे प्रगतिपथावर

याशिवाय महावितरणमार्फत प्रस्तावित अतिरिक्त 49 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची कामे प्रगतिपथावर आहेत. यात नवी मुंबई -10, ठाणे-6, नाशिक -2, औरंगाबाद-2, पुणे- 17, सोलापूर- 2, नागपूर -6, कोल्हापूर – 2, अमरावती – 2 अशा चार्जिंग स्टेशनचा समावेश आहे. यासोबतच राज्य शासनाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 दि. 23 जुलै 2021 रोजी जाहीर केले आहे.

Back to top button