खा. इम्तियाज जलील : ‘कामगाराला अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा’ | पुढारी

खा. इम्तियाज जलील : ‘कामगाराला अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा’

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : सिटीचौक पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या एका सोनार दुकानातील कामगाराला रविवारी (दि.१) रात्री पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. हा व्हिडीओ खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी (दि. २) ट्विटर अकाऊंटवरून व्हायरल केला. तसेच कामगाराला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तातडीने पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी निलंबनाची कारवाई करावी, अन्था पोलिस आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.

रविवारी सिटीचौक परिसरात रात्रीच्या वेळी काही कामगार बाहेर रस्त्यावर आले होते. त्यांना पोलिसांनी आत जाण्याची सूचना केली. ते आत जात असतांनाच पोलिसांनी त्यातील एका कामगाराला बेदम मारहाण केली. त्यानंतर दुकानात येऊन एका पोलिस कर्मचाऱ्याने कामगारा तोंड फुटेपर्यंत मारले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

ही माहिती खासदार इम्तियाज जलील यांना कळाली. त्यांनी सीसीटीव्हीचे हे फुटेज ट्वीट करून पोलिस आयुक्तांनी अशी पोलिसिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेतून काढून टाकावे, अशी मागणी केली. तसेच या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याची सूचना देखील केली आहे.

काय म्हणाले खासदार जलील

मला एकाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात सिटीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनार दुकानात काम करणाऱ्या पश्चिम बंगाल येथील कामगाराला पोलिस कर्मचारी बेदम मारहाण करताना दिसत आहे. हा तरुण पाणी आणण्यासाठी खाली गेला होता. रस्त्यावर कोणीच दिसायचे नाही, असे आवाहन पोलिस करीत होते. त्याला पाहताच पोलिसांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. दुकानात आल्यानंतरही मारहाण केली. त्यामुळे हा व्हिडिओ ट्वीट करून तातडीने पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून निलंबनाच्या कारवाईची मागणी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांना केली आहे.

राष्ट्रीय मानवाधिकारमध्ये जाणार

जर याप्रकरणी तातडीने पोलिस आयुक्तांनी त्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली नाही. तर एमआयएम पोलिस आयुक्तालयासमोर आंदोलन तर करेल. तसेच त्यासोबतच या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार देखील करणार आहोत, असेही खा. जलील यांनी सांगितले.

Back to top button