बीड : अवीट चवीचा गावरान आंबा होतोय हद्दपार; आर्थिक उत्‍पन्न कमी, आंबे लागवडीकडे कल | पुढारी

बीड : अवीट चवीचा गावरान आंबा होतोय हद्दपार; आर्थिक उत्‍पन्न कमी, आंबे लागवडीकडे कल

बीड ; गजानन चौकटे गावागावात शेतातील बांधावर तसेच शिवारात पूर्वी गावरान अंब्याची झाडे होती. आता बदलत्या वातावरणा नुसार गावारान रसदार आंबा गेवराई तालुक्यात हद्दपार होत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

गावातून शेताकडे जाणाऱ्या मार्गावर गार सावली देणार ही गावरान आंब्याची झाडे आता फारच कमी होत चालली आहेत. उत्पन कमी होत असल्याने गावरान अंब्याची झाडे कमी झाली आहेत. यामुळे गावरान आंबा आता इतिहास जमा होतो कि काय असे वाटू लागले आहे. तालुक्यातून गावरान आंबा आता हद्दपार होत आहे.

गावरान अंब्याचा घेर इतर झाडांच्या तुलनेत खूप मोठ असतो. यामुळे या झाडाची मोठी सावली असते. त्यामुळे इतर पीक घेण्यास अडचण येते. यामुळे इतर पिके जळून जातात, त्यामुळे आता कलमी आंबे लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक वाढू लागला आहे.
शेताच्या बांधावर दिसणारी गावरान आंब्याची बाग गेल्या काही वर्षात बदलत्या हवामानामुळे दुर्मिळ होऊ लागली आहे. त्यातच गेल्या वर्षी उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसाने व नंतर बदलत्या हवामानामुळे यंदा गावरान आंबा मिळणं फार दुरापास्त झाल आहे. त्यामुळे यंदा केशर आंबा भाव खाण्याची शक्यता आहे.

रस व लोणच्यासाठी बहुदा गावरान आंबा वापरला जातो. त्यालाच अधिक पसंती दिली जाते. पूर्वी जमिनीचे अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी होती. गावोगावी अशा शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर मोठ्या प्रमाणावर आंब्याची झाडे असायची. काही गावांमध्ये तर आंब्याच्या झाडावरून त्या शेतकऱ्याची ओळख असायची.

बदलत्या काळात जमिनीचे क्षेत्रही घटले आणि शेतकऱ्यांनी गावरान ऐवजी कलमी आंब्याकडे मोर्चा वळवला. कलमी आंब्याला पहिल्या वर्षी अंबा लागतो. २ ते ३ वर्षानंतर भरपूर आंबे येतात. याउलट गावरान अंब्याला कधी दोन तर कधी तीन वर्षापर्यात भरच येत नाही. त्यातच गावरान आंब्यावर बदलत्या हवामानाचा परिणाम होत आहे. या वर्षी पावसाळा लांबला त्यानंतर सतत हवामान बदलत राहील यामुळे यांचा मोठ्या प्रमाणावर आंब्याचा मोहर गळून गेला. त्यामुळे यंदा गावरान आंबा मिळणे दुर्मिळ झाले आहे.

गावरान आंब्याला क्षेत्र जास्त लागतं. याउलट नवीन वाणांच्या आंब्यांना जास्त क्षेत्र लागत नाही. त्यांचे नियोजन चांगले केले, हवामानाकडे लक्ष देऊन फवारणी केली तर उत्पादनही चांगले मिळते. त्यातूनच कमाई चांगले होते.

चंद्रभान नरोटे, अंबा उत्पादक शेतकरी, धोंडराई

सर्व फळांचा राजा म्हणजे आंबा परंतु गेल्या काही वर्षापासून गावरान आंबा खायलाच मिळत नाही. अगोदर गावरान आंबे चाखायला मिळायचे. त्या रसदार आंब्याला अमृताची चव होती, परंतु आता दिवसेंदिवस बदलत्या हवामानानुसार गावरान आंबा दिसेनासा झाला आहे.

बंडू आरसुळ जेष्ठ नागरिक रोहितळ

Back to top button