Sri Lanka economic crisis : श्रीलंकेच्या मदतीला भारत धावला! ४० हजार टन तांदूळ पाठविण्याची तयारी सुरु | पुढारी

Sri Lanka economic crisis : श्रीलंकेच्या मदतीला भारत धावला! ४० हजार टन तांदूळ पाठविण्याची तयारी सुरु

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

श्रीलंकेतील आर्थिक संकटानंतर (Sri Lanka economic crisis) आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. जीवनाश्यक वस्तू, इंधन महागल्याने लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतातून श्रीलंकेत ४० हजार टन तांदूळ पाठविला जाणार आहे. भारतीय व्यापाऱ्यांनी तांदूळसाठा श्रीलंकेला तातडीने पाठवण्यासाठी लोडिंग सुरु केले आहे, असे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दोन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर दिले आहे.

श्रीलंकेची लोकसंख्या २ कोटी २० लाख आहे. पण गेल्या दोन वर्षांत इथल्या परकीय चलनाच्या साठ्यात ७० टक्के घसरण झाल्यामुळे चलनाचे अवमूल्यन झाले आहे. यामुळे महागाईने उच्चांक गाठला आहे. इथे इंधनाचा प्रचंड तुटवडा आहे, अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत.

भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. श्रीलंकेतील इंधन, अन्न आणि औषधांसह अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा दूर करण्यासाठी भारत १ अब्ज डॉलर कर्ज देणार आहे. भारतातून होणाऱ्या तांदूळ पुरवठ्यामुळे श्रीलंकेतील तांदळाच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे. भारतातून पाठवण्यात आलेला तांदूळ श्रीलंकेत एप्रिलच्या मध्यावधीला उपलब्ध होईल, असा अंदाज भारतीय व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. भारतीय व्यापारी येत्या आठवड्यात साखर, गहू आणि अन्य जीवनावश्यक वस्तू पाठवण्यास सुरुवात करतील, असे एका डीलरकडून सांगण्यात आले आहे.

२०२१ मध्ये श्रीलंकेत सर्व रासायनिक खतांवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे उत्पादन घटल्याने श्रीलंका तांदळाचा आयातदार बनला आहे. श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. शुक्रवारीदेखील श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या निवासस्थानासमोर लोकांनी जोरदार निदर्शने केली. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आणीबाणी (state of emergency) जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे (Sri Lanka President Gotabaya Rajapaksa) यांनी १ एप्रिल २०२२ पासून सार्वजनिक आणीबाणी जाहीर करणारे राजपत्र जारी केले आहे.

श्रीलंकेच्या आर्थिक विकासाचे (Sri Lanka economic crisis) पूर्ण गणितच कोलमडले आहे. तर दुसरीकडे, श्रीलंकेने गेल्या काही वर्षांमध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले आहे. ही कर्जाची रक्‍कम भरमसाट वाढत गेली. श्रीलंकेवरील कर्ज १६ ते १७ अब्ज डॉलर्स इतके असून, यापैकी १० ते १२ अब्ज डॉलर्स हे एकट्या चीनकडून घेतलेले आहे.

 हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : पाणस्थळी हमखास दिसणाऱ्या भोरड्यांच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? | Rosy starling

Back to top button