कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : ईर्ष्येने ९८ टक्के मतदान | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : ईर्ष्येने ९८ टक्के मतदान

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) बुधवारी विक्रमी 98 टक्के मतदान झाले. 7 हजार 651 मतदारांपैकी 7 हजार 498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 21 संचालकांपैकी संस्था गटातील सहा जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. 15 जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात होते. शुक्रवारी (दि. 7) रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणी होणार असून, सकाळी दहा वाजता संस्था गटातील निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्र्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, विनय कोरे, प्रकाश आवाडे, राजूबाबा आवळे यांच्यासह आजी-माजी खासदारांचे भवितव्य मतदारांनी मतपेटीत बंद केले आहे.

जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) काँग्रेस-राष्ट्रवादी, जनसुराज्य आणि भाजप अशी मित्रपक्षांची छत्रपती शाहू शेतकरी आघाडी याविरोधात शिवसेना, आरपीआय, शेकाप अशी मित्रपक्षांची छत्रपती शाहू परिवर्तन आघाडी रिंगणात आहे. शिवसेनेची एका वाढीव जागेची मागणी अमान्य झाल्याने शिवसेनेने विरोधात पॅनेल उभे केले आहे. यापूर्वी मंडलिक हे जिल्हा बँकेत सत्तारूढ आघाडीबरोबरच होते. त्यांनी दोन सेवा संस्था आणि इतर नऊ जागा अशा अकरा जागांवर पॅनेल करत शड्डू ठोकला आहे.

ही निवडणूक आरोप-प्रत्यारोपांनी गाजली. काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपला सोबत घेतल्याने शिवसेनेच्या जहरी टीकेचा सामना नेत्यांना करावा लागला. जिल्ह्यातील अंबानी आणि अदानीपासून जिल्हा बँक वाचवूया, या संजय मंडलिक यांच्या वक्तव्याने राजकारण ढवळून निघाले. त्याला सतेज पाटील व मी जनतेचे श्रावणबाळ आहोत, अशा भाषेत मुश्रीफ यांनी उत्तर दिले. जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणार्‍या या निवडणुकीबाबत कमालीची उत्कंठा आहे.

संचालकांच्या 15 जागांसाठी बुधवारी जिल्ह्यातील 13 ठिकाणी 40 केंद्रांवर मतदान झाले. सकाळी आठ वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. केंद्रांबाहेर उमेदवार, नेते आणि कार्यकर्ते मतदारांना नमस्कार करीत होते. यातून जिल्ह्याने दिवसभर टोकाची ईर्ष्या अनुभवली.

कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यासाठी प्रतिभानगर येथील वि. स. खांडेकर प्रशालेत मतदान झाले. तेथे सतेज पाटील, हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, पी. एन. पाटील, चंद्रदीप नरके, महादेवराव महाडिक यांनी भेट दिली. एका एका मतदारासाठी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांची अक्षरशः ईर्ष्या पणाला लागली होती.

सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. संस्था गटातील उर्वरित सहा जागा जिंकण्यास अडचण नाही. त्यामुळे बँकेत सत्ता येण्यास अडचण नसल्याचे सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी मतदानानंतर दावा केला आहे. तर प्रस्थापित नेत्यांच्या ‘हम करे सो कायदा’ या प्रवृत्तीला जागरूक मतदार दणका दिल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रत्युत्तर विरोधी आघाडीच्या नेत्यांनी दिले आहे. दोन्ही बाजूंनी केलेला विजयाचा दावा, आरोप-प्रत्यरोपांनी गाजलेला निवडणूक प्रचाराचा फड, निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत झालेली बिघाडी, यामुळे निवडणूक निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

उत्साही वातावरण ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

वि. स. खांडेकर मतदान केंद्रावर सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत दोन्ही आघाड्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. मतदान केंद्र परिसरात दुपारी बारानंतर सत्ताधारी आघाडीची प्रमुख नेते मंडळी भेट देऊन गेली. यानंतर सत्ताधारी आघाडीचे एक-दोन उमेदवारच आवारात होते. तर विरोधी आघाडीचे माजी आमदार चंद्रदीप नरके हे प्रमुख कार्यकर्त्यांसह उपस्थित होते.

मंडलिकांच्या दहा, तर मुश्रीफांच्या आठ बोटांना शाई ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

संजय मंडलिक यांच्या एकट्याच्या नावावर दहा ठराव होते. त्यांनी कागल आणि कोल्हापूर शहरातील मतदान केंद्रांवर मतदान केले. दहा ठराव असल्याने मंडलिक यांनी तब्बल 50 हून अधिक मते देत तितके शिक्के मारले. दहा प्रकारच्या मतपत्रिका घेताना मंडलिक यांच्या दहा बोटांना शाई लावण्यात आली, तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावावर आठ ठराव होते. त्यांनी 40 मते दिली.त्यामुळे मुश्रीफ यांच्या आठ बोटांना शाई लावण्यात आली.

मतदानाचा टक्का वाढला ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

निवडणूक बिनविरोध होणार म्हणता म्हणता कमालीची चुरस निर्माण झाली. महाआघाडीतील घटकपक्ष शिवसेनेने मैदानात उतरून आव्हान दिल्याने ही चुरस वाढली. 2009 साली बँकेत प्रशासकराज सुरू झाले. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी अशी लढत झाली होती. तेव्हा 94 टक्के मतदान झाले होते. यंदा चुरशीने 98 टक्के मतदान झाल्याने वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्सुकता आहे. मतदानाचा हा विक्रम आहे.

भुदरगड, गडहिंग्लज, शाहूवाडीत कमालीची चुरस; 100 टक्के मतदान ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

शाहूवाडी, गडहिंग्लज आणि भुदरगड तालुका संस्था गटात 100 टक्के मतदान झाले. शाहूवाडीत 99, गडहिंग्लज 106, तर भुदरगडमधील 208 मतदारांनी हक्क बजावला. शिरोळ तालुक्यात 150 पैकी 149 मतदारांनी मतदान केले. आजरा तालुक्यात 107 पैकी 106, पन्हाळा तालुक्यात 244 पैकी 243 मतदारांनी मतदान केले.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. जिल्ह्यातील बहुतांश मतदान केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या. शिरोळ, भुदरगड आणि राधानगरी तालुक्यांतील ईर्ष्या लक्षात घेता तेथील प्रत्येक घडामोडीची माहिती घेऊन सूचना देत होते.

शिरोळमध्ये टोकाचा संघर्ष

शिरोळमध्ये संस्था गटात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विरुद्ध दत्त शिरोळचे अध्यक्ष गणपतराव पाटील अशी चुरशीची लढत आहे.

शाहूवाडीकडे सर्वांचे लक्ष

शाहूवाडीत विकास संस्था गटात जनसुराज्य शक्तीचे सर्जेराव पाटील-पेरिडकर विरुद्ध रणवीर गायकवाड यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

गडहिंग्लजमध्ये विद्यमान आमने-सामने

गडहिंग्लजमध्ये विकास संस्था गटातून संतोष पाटील व विनायक ऊर्फ अप्पी पाटील या दोन विद्यमान संचालकांत लढत रंगली आहे.

भुदरगडमध्ये वर्चस्वासाठी लढत

भुदरगडमध्ये माजी आमदार के. पी. पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील विरुद्ध यशवंत नांदेकर अशी चुरस आहे. येथे बँकेच्या निवडणुकीनिमित्त के. पी. पाटील व आ. प्रकाश आबिटकर आपली ताकद आजमावत आहेत.

आजर्‍यात चराटी विरुद्ध देसाई

आजरा तालुक्यात विकास संस्था गटातून विद्यमान संचालक अशोक चराटी व सुधीर देसाई यांच्यात चुरस आहे.

पन्हाळ्यात लढत

पन्हाळा तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे आ. विनय कोरे यांच्या विरोधात विजयसिंह पाटील निवडणूक रिंगणात आहेत.

पतसंस्था गटात टोकाची ईर्ष्या

नागरी बँका, पतसंस्था गटात तिरंगी लढत आहे. या गटातून गेल्या निवडणुकीत भाजपकडून विजयी झालेले अनिल पाटील अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. आ. प्रकाश आवाडे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अर्जुन आबिटकर यांच्यात लढत आहे. अर्जुन आबिटकर हे आ. प्रकाश आबिटकर यांचे बंधू आहेत. त्यामुळे या गटातील लढतीकडेही लक्ष आहे.

इतर शेती संस्था व्यक्ती सभासद गटात विद्यमान संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप ऊर्फ भैया माने व शेतकरी कामगार पक्षाचे माजी आ. संपतराव पवार-पाटील यांचे चिरंजीव क्रांतिसिंह यांच्यात थेट लढत आहे.

महिला गटातील चुरस कायम

महिला गटामध्ये शिवसेनेच्या माजी खासदार निवेदिता माने सत्तारूढ आघाडीतून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. विद्यमान संचालिका उदयानीदेवी साळुंखे यांना डावलून काँग्रेसने श्रुतिका काटकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना आघाडीतून रेखा कुराडे व पी. जी. शिंदे यांच्या पत्नी लतिका शिंदे निवडणूक रिंगणात आहेत. पी. जी. शिंदे विद्यमान संचालक आहेत.

आमदार विरुद्ध कार्यकर्ता

अनुसूचित जाती, जमाती गटात आ. राजू आवळे व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्यात लढत आहे.

माजी सभापती विरुद्ध माजी गोकुळ संचालक

विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग गटात ‘गोकुळ’चे माजी संचालक विश्वास जाधव व करवीर पंचायत समितीच्या सभापती स्मिता गवळी यांच्यात लढत होत आहे.

इतर मागासवर्गीय गट

इतर मागासवर्गीय गटातून सत्तारूढ आघाडीतील जनसुराज्य शक्ती पक्षाचे विजयसिंह माने व शिवसेना आघाडीकडून करवीर पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मडके यांच्यात लढत रंगतदार आहे.

निवडणूक लावणारा गट

कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया गटातून शिवसेना आघाडीकडून खा. संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्याविरोधात सत्तारूढ आघाडीकडून प्रदीप पाटील-भुयेकर व मदन कारंडे रिंगणात.

Back to top button