कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : वाटाघाटी लांबणीवर; सोमवारी अंतिम निर्णय | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : वाटाघाटी लांबणीवर; सोमवारी अंतिम निर्णय

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ( kolhapur district bank election ) सर्वसमावेशक पॅनेलचा आराखडा तयार करण्यासाठी शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय झाला नाही. पुन्हा रविवारी आणि सोमवारी नेत्यांची चर्चा होणार आहे. सोमवारी (दि.20) सकाळी 11 वाजता पॅनेलची घोषणा करण्याचे बैठकीत ठरले. चर्चेतून तोडगा निघेल, बँकेच्या राजकारणात सर्वपक्षीय एकोपा राहील, असा विश्‍वास ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि आ. पी. एन. पाटील यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्‍त केला.

शासकीय विश्रामगृहात मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खा. संजय मंडलिक, आ. पी. एन. पाटील, आ. विनय कोरे, ए. वाय. पाटील आणि के. पी. पाटील यांच्यात सुमारे दीड तास बैठक झाली. तालुक्यातील सेवा संस्था गटातील ( kolhapur district bank election ) 11 जागांवर त्या-त्या उमेदवाराने आपल्या ताकदीवर लढावे. परंतु, यातील काही जागा बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.

काँग्रेस चार, राष्ट्रवादी तीन अशा सात जागांपैकी किती जागा सोडणार, याबाबत मतमतांतरे आहेत. नऊ जागा वाटपाबाबत तोडगा न निघाल्याने पुन्हा रविवारी चर्चा होणार आहे. सोमवारी सर्व नेत्यांची बैठक घेऊन अकरा वाजता पॅनेलची घोषणा करण्यात येणार आहे. सकारात्मक चर्चा सुरू असून कोणीही नाराज नाही तोडगा निघेल, असा विश्‍वास आ. पी.एन. पाटील यांनी व्यक्‍त केला.

सरपंच संघटनेला केडीसीमध्ये संधी देण्याची मागणी ( kolhapur district bank election )

कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंच संघटनेला संधी द्यावी, अशी मागणी आज सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा सरपंच संघटना अध्यक्ष संजय बटकडली यांनी इतर मागास गटातून उमेदवारीची मागणी केली आहे. अखिल भारतीय सरपंच परिषद संस्थापक अध्यक्ष जयंतदादा पाटील (कुर्डूकर) यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सरपंच शिष्टमंडळासह जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन उमेदवारी मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, माजी मंत्री व आमदार विनय कोरे यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली.

लोकशाही आणि सहकारात जोपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेतले जात नाहीत तोपर्यंत चर्चा सुरूच राहील. तोडगा निघेल एकोपा होईल. परंतु, बिनविरोध असा मी काही दावा करणार नाही. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून बँकेचा कारभार चालेल त्याद‍ृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांना माघारीसाठी विनंती करू. अद्याप फॉर्म्युला असा काही ठरलेला नाही, त्यावर चर्चा सुरू आहे.
– ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

Back to top button