नारायण राणे म्हणाले, राज्य सरकारचे अस्तित्व आहेच कुठे? | पुढारी

नारायण राणे म्हणाले, राज्य सरकारचे अस्तित्व आहेच कुठे?

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी ती कुठेच दिसत नाही. या सरकारचे अस्तित्व आहेच कुठे, असा खोचक सवाल केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांनी रविवारी केला. राज्य सरकारने राज्याला दहा वर्षे मागे नेल्याची टीकाही त्यांनी केली.

्आ‍रोग्य विभागाच्या परीक्षांपाठोपाठ म्हाडाच्या परीक्षेत गोंधळ झाला. त्याचा संदर्भ देत राणे म्हणाले, राज्य सरकारचा प्रमुखच कार्यरत नसेल, त्याचा कुणावर अंकुश नसेल, तर काय होणार! शेतकरी, मजूर, विद्यार्थी, कामगार यांचे प्रश्न, विकासाचे प्रश्न आहेत तसेच आहेत. त्याची सोडवणूक होत नाही. याला इतके दिले, त्याला तितके दिले, हे केवळ कागदावरच चालू आहे.

प्रत्यक्षात हातात काहीच मिळत नाही.त्यामुळे राज्याचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. परीक्षांचे पेपर फुटत आहेत. पैसे घेऊन राजरोसपणे या गोष्टी सुरू आहेत. सरकारचा कोणावरही अंकुश नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा नेता आता राहिला नाही, या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राणे यांनी समाचार घेतला. गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात भाजप वाढवण्यासाठी फार कष्ट घेतले. आत्ताचे नेतेही पक्षवाढीसाठी कष्ट घेत आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, कोल्हापुरातील उद्योजकांनी पुढे यावे. त्यांना आपला विभाग सहकार्य करेल, प्रोत्साहन देईल, असे राणे यांनी सांगितले. नवीन उद्योजक तयार करणे, त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे, उत्पादन वाढवणे, त्याची निर्यात वाढवणे, त्यातून जीडीपी वाढवणे आणि या सर्वांतून देशाला आत्मनिर्भर बनविणे हेच मोदी सरकारचे ध्येय आहे.

कोल्हापूरच्या तरुण-तरुणींनी उद्योगासाठी पुढे यावे. आपल्या विभागामार्फत केल्या जाणार्‍या कामाची माहिती, त्याचे प्रशिक्षण दिले जाईल. याबाबत जिल्हाधिकारी कार्यक्रम घेतील. आपल्या विभागाचे अधिकारी मार्गदर्शनासाठी येतील, असेही राणे यांनी सांगितले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.

 

Back to top button