एस.टी.ची माल, टपाल वाहतूक ठप्प | पुढारी

एस.टी.ची माल, टपाल वाहतूक ठप्प

कोल्हापूर : डी. बी. चव्हाण : कोरोनाच्या काळात प्रवाशांअभावी एस.टी. प्रवासी वाहतूक ठप्प होती; पण त्या काळात एस.टी.ला आधार दिला होता तो मालवाहतूक आणि टपाल वाहतुकीने. मालवाहतुकीतून कोल्हापूर विभागाला दिवसाला 1 लाख, तर टपाल वाहतुकीतून 50 हजार, असे सुमारे दीड लाख रुपये उत्पन्‍न मिळत होते. सध्या कर्मचार्‍यांच्या संपामुळे गेले महिनाभर एस.टी.चे हेही उत्पन्‍न बुडाले आहे.

महिनाभरापासून विलीनीकरणाच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी संप सुरू ठेवला आहे. यामुळे एस.टी.ची टपाल वाहतूक थांबली आहे. एस.टी. बसमधून रेल्वेस्थानकावरून टपाल घेऊन ते तालुक्यांना पोहोचविण्याचे काम केले जात होते. त्यासाठी महामंडळ प्रशासनाकडून चालक व वाहकांना तशा सूचना दिल्या जातात, त्यानुसार त्यांच्याकडून कार्यवाही होत होती. यातून विभागाला दिवसाला किमान 50 हजार रुपयांचे उत्पन्‍न मिळत होते, आता ते थांबले आहे.

कोल्हापूर विभागाने 50 बसेस मालवाहतुकीसाठी दिल्या होत्या. यातील 20 ते 25 बसेसमधून मालवाहतूक केली जात होती. यातून दिवसाला 1 लाख रुपये उत्पन्‍न मिळत होते. कोरोनाच्या कालावधीत कोल्हापूर विभागाला मालवाहतुकीतून 55 ते 60 लाख रुपयांचा महसूल मिळाला होतो. कोरोना कमी झाल्यानंतरही मालवाहतूक सेवा सुरू होती; पण आता संपामुळे मालवाहतुकीतून मिळणारे उत्पन्‍नही बुडाले आहे. याचा फटका एस.टी.च्या एकूण उत्पन्‍नाला बसला आहे.

मालवाहतूक व्यवस्था

एस.टी. महामंडळाला प्रवासी वाहतुकीशिवाय अन्य उत्पन्‍नाचा स्रोत निर्माण व्हावा, यासाठी मालवाहतूक योजना सुरू केली. पहिली दोन वर्षे या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, कोरोना आला आणि प्रवासी वाहतूक थांबली. त्यावेळी एस.टी. प्रशासनाने बसेसमधून मालवाहतूक करण्याच्या योजनेला गती देण्याचा निर्णय घेतला. यासाठी राज्यातून सुमारे 500 अधिक बसेस महामंडळाने दिल्या होत्या.

Back to top button