मान्सूनच्या आगमनाने पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग | पुढारी

मान्सूनच्या आगमनाने पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग

शिरढोण; बिरु व्हसपटे : मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांची खरीप पेरणी तयारीची लगबग वाढली आहे. शिरढोण, टाकवडे, नांदणी, जांभळी, हरोली, धरणगुत्ती परिसरात शेतकरी वर्ग मशागतीच्या कामात गुंतला आहे. खरीप तयारीसाठी शिवारं अरक्षश: फुलून गेली आहेत.

६ जून पासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्याप्रमाणे ढग व वातावरण निर्माण झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाचे वातावरण राहिल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. उन्हाळी पिके काढून खरिपासाठी जमिनी तयार करण्यासाठी घाई सुरू झाली आहे. पेरणीसाठी सकाळी लवकर संपूर्ण कुटुंब शिवारात दाखल झालेली असतात. दिवसभर झटून काम पूर्ण करण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो.

मशागतीची कामे एकदम सुरू झाल्याने ग्रामीण भागात रोटर, बैलांच्या औतासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे. रोटरच्या मशागतीचा दर त्याच्या मालकावर अवलंबून असल्याने प्रत्येक गावात वेगवेगळे दर पाहावयास मिळतात. बैलांचे औत काहीसे महागले आहे. बैलांची संख्या कमी झाल्याने गावात एक-दोनच बैलांची औत असल्याची परिस्थिती आहे. त्यालाही खूप मागणी आहे, त्यामुळे आठवडाभर नंबर लावून ठेवावे लागत आहे. त्यातही गडबडीत जमीन तयार करून पेरणी करायची झाल्यास लहान रोटरचा वापर चांगला होतो; पण तेही वेळेत मिळत नाही. शेतकऱ्याला सकाळी लवकर रोटर चालकाच्या दारात जाऊन बसावे लागत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

सध्या काही गावांत बैलांच्या औताचे दर प्रति दिन १२०० ते १३०० रुपये आहे. रोटरचे दर कामानुसार ठरलेले आहेत, तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत बैलांच्या औतांच्या दरात वाढ झाली असून रोटरचे दर प्रत्येक गावातील मागणीनुसार आकारले जात आहेत.

हेही वाचा : 

Back to top button