विधानसभा पार्श्वभूमीवर विरोधकांना वातावरण बिघडवायचे आहे का? : आ. सतेज पाटील

file photo
file photo

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी दंगली घडविल्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना वातावरण बिघडवायचे आहे का, असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला.

शांत शहर म्हणून ओळखण्यात येणार्‍या कोल्हापुरात दर दोन दिवसाला खून होत आहेत. यंत्रणा बिघडली असल्याने कळंबा कारागृहात दर दोन दिवसाला नवनवीन गोष्टी सापडत आहेत. ते कमी म्हणून आता कारागृहात खूनही होऊ लागले आहेत. राजकीय यंत्रणेत पोलिस अडकल्याचे दिसते. त्यामुळे कोल्हापुरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत यावेत, यासाठी सुरुवातीपासूनआपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो. त्यांनी आघाडीला लेखी स्वरूपात पाठिंबा द्यावा, अशी आमची अपेक्षा होती. परंतु, यात खूप वेळ गेला. राज्य पातळीवरही बरेच समज, गैरसमज झाल्यामुळे निर्णय बदलला गेला. पण, शेट्टी यांची महाविकास आघाडीने कोणतीही फसवणूक केलेली नाही, असे आ. पाटील यांनी शेट्टी यांच्या आरोपावर सांगितले.

जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरणार

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबतचे सूत्र राज्य पातळीवर ठरविण्यात येणार आहे. त्याचा फॉर्म्युला ठरलेला नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते एकत्र बसून तो ठरवतील. कोल्हापुरातही अद्याप काही ठरलेले नाही. परंतु, येणार्‍या विधानसभेमध्ये नवीन टीम दिसेल. सांगलीत जयंत पाटील आणि काँग्रेस नेत्यांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले आहेत; पण ते लवकरच मिटतील, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा शेट्टी यांना नको होता

लोकसभा निवडणुकीसाठी राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीतील केवळ शिवसेनेचा पाठिंबा हवा होता. काँग्रेस, राष्ट्रवादीचा त्यांना पाठिंबा नको होता, अशी त्यांची सुरुवातीची भूमिका होती. या भूमिकेत बदल करेपर्यंत खूप वेळ झाला होता, असे आ. पाटील यांनी सांगितले.

शक्तिपीठविरोधात आजचा मोर्चा ताकदीने काढणार

शक्तिपीठ महामार्गाबाबत भाजपने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. ठेकेदारांच्या फायद्यासाठी हा महामार्ग करण्यात येत आहे. त्याच्या विरोधात सर्व शक्तीनिशी मंगळवारी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामार्गाबाबत अधिसूचना काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार हा महामार्ग करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते, असेही आ. पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news