विरोध डावलून ‘शक्तिपीठ’ची अधिसूचना का?

विरोध डावलून ‘शक्तिपीठ’ची अधिसूचना का?

[author title="संतोष बामणे" image="http://"][/author]

जयसिंगपूर : शक्तिपीठ महामार्ग पत्रादेवी-बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) ते दिगरज (जि. वर्धा) असा 805 किलोमीटरचा आहे. यासाठी 86 हजार 500 कोटी रुपये खर्ची लावले आहेत. हा महामार्ग 12 जिल्ह्यांतील 37 तालुक्यांतील 368 गावांतून जाणार असून, यात 27 हजार 500 एकर जमीन जाणार आहे. याला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे. आठ दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन हा महामार्ग रद्द करण्याची मागणी केली असताना प्रत्येक जिल्ह्यात भूसंपादनाची अधिसूचना निघत आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरची अधिसूचना काढली आहे. त्यामुळे शक्तिपीठच्या विरोधात मंगळवारी (दि. 18) कोल्हापुरात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम टप्प्यात असताना या महामार्गाच्या जवळपासच शासनाने शक्तिपीठ महामार्ग मंजूर केला आहे. राज्यातील 12 हजार 589 गट नंबरमधरून हा महामार्ग जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग रिअल इस्टेट कायद्यांतर्गत ही जमीन संपादित केली जाणार आहे. मागणी नसतानाही शासनाने महामार्ग मंजूर केला आहे. सध्या रत्नागिरी-नागपूर महामार्ग या तीर्थक्षेत्राजवळूनच जातो. हजारो एकर जमीन जाणार असून, शेतकरी भूमीहीन होणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी या महामार्गाला विरोध केला आहे. असे असतानाही शासनाने महामार्गाचे काम सुरूच ठेवले आहे. त्यापाठोपाठ प्रत्येक जिल्ह्याची भूसंपादनाची अधिसूचनाही निघत आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा, अशी मागणी केली आहे. जिल्ह्यातील शेतकरी व सर्वपक्षीय नेत्यांचाही विरोध आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी शक्तिपीठच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. आता शासन विरुद्ध शक्तिपीठ विरोधातील शेतकरी, असा वाद निर्माण झाला आहे.

शक्तिपीठ महामार्ग ही तीर्थक्षेत्रे जोडणार

शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुकादेवी अशी तीन शक्तिपीठे जोडणार आहे. त्याचबरोबर औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंगे, पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरू गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर, सांगलीतील औदुंबर, कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी, पट्टणकोडोली, सांगवडे, कणेरी मठ, आदमापूर यासह इतर तीर्थक्षेत्रांना जोडण्यात येणार असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.

असा आहे शक्तिपीठ महामार्ग

पत्रादेवी-बांदा (ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग) ते दिगरज (जि. वर्धा) असा 805 कि. मी., एकूण खर्च- 86 हजार 600 कोटी, 12 जिल्हेे 37 तालुक्यांतील 368 गावांतील 12 हजार 889 गटांतील 27 हजार 500 एकर जमीन संपादित होणार आहे. यात 48 मोठे पूल, 28 ठिकाणी रस्ते क्रॉसिंग, 3 ठिकाणी डोंगर पोखरून बोगदे, 386 गावातील नैसर्गिक संपदा नष्ट होणार आहे.

जिल्हानिहाय असा होणार महामार्ग

वर्धा 36 कि.मी., यवतमाळ 129 कि.मी., हिंगोली 34 कि.मी., परभणी 71 कि.मी., नांदेड 26 कि.मी., बीड 46 कि.मी., लातूर 41 कि.मी., धाराशिव 43 कि.मी., सोलापूर 156 कि.मी., सांगली 57 कि.मी., कोल्हापूर 123 कि.मी., सिंधुदुर्ग 39 कि.मी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news