Lok Sabha Election 2024 | इस्लामपूरमध्ये धैर्यशील माने- सत्यजित पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, नेमकं काय घडलं? | पुढारी

Lok Sabha Election 2024 | इस्लामपूरमध्ये धैर्यशील माने- सत्यजित पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, नेमकं काय घडलं?

सांगली, पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इस्लामपूरमधील साखराळे येथे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील- सरूडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी हाणामारी झाली. येथील मतदान केंद्रावर बोगस प्रतिनिधी बसवण्याच्या कारणातून हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे. यात पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला. परंतु या हाणामारीमुळे साखराळेमधील मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया काही काळ थांबली होती. इस्लामपूरमध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ३७.२० टक्के मतदान झाले होते.

सांगली लोकसभेसाठी दुपारी १ पर्यंत २९.६५ टक्के मतदान

दरम्यान, सांगली लोकसभेसाठी दुपारी १ वाजेपर्यंत २९.६५ टक्के इतके मतदान झाले. भर उन्हातदेखील सांगलीकर मतदानासाठी बाहेर पडले. सकाळी नऊ वाजेपर्यंत ५.८१ टक्के इतके कमी मतदान झाले होते. त्यानंतर सकाळी ११ पर्यंत १६.८१ टक्के इतके मतदान झाले. त्यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत २९.६५ टक्के इतके मतदान झाले होते.

आज ७ मे रोजी देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातील बारामती, रायगड, सातारा, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांचा तिसरा टप्प्यात समावेश आहे.

महाराष्ट्रात होत असलेल्या ११ लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसह अपक्षांनीही प्रचारासाठी चांगलाच जोर लावला होता.
हे ही वाचा :

Back to top button