Kolhapur Lok Sabha Election : कोल्हापुरात बंडखोर निलंबित; विशाल पाटलांचे काय? | पुढारी

Kolhapur Lok Sabha Election : कोल्हापुरात बंडखोर निलंबित; विशाल पाटलांचे काय?

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्याविरोधात बंडखोरी करणारे उमेदवार बाजीराव खाडे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. सांगलीबाबत मात्र पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून उद्या गुरूवारी याबाबत काही निर्णय होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी बुधवारी खाडे यांच्यावर ही कारवाई केली आहे. सांगलीत विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने ते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यावर काय कारवाई होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्या गुरूवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सांगलीत जाण्याची शक्यता असून येथे ते स्थानिक नेते व कार्यकर्ते यांच्याशी भेटून पाटील यांच्यावरील कारवाईबाबत निर्णय घेणार आहेत. आज खाडे यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे पाटील यांच्यावर काय कारवाई होऊ शकते याचे संकेत मिळाले आहेत.

निष्ठावंत खाडेंवर अखेर कारवाई

गेल्या 28 वर्षांपासून काँग्रेसचे काम करणारे खाडे हे राहूल गांधी,प्रियांका गांधी यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव खाडे प्रयत्नशील होते. ती न मिळाल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. खाडे यांनी माघार घ्यावी यासाठी पक्षातर्फे मनधरणी करण्यात आली होती. मात्र त्यास दाद न देता त्यांनी बंडखोरी केली. त्यामुळे पक्षाने कारवाईचे पाऊल उचलले आहे.

Back to top button