ज्यांना निवडून दिले ते बिनकामाचे निघाले; विविध समाज संघटनांच्या बैठकीत मंडलिक यांच्यावर टीका | पुढारी

ज्यांना निवडून दिले ते बिनकामाचे निघाले; विविध समाज संघटनांच्या बैठकीत मंडलिक यांच्यावर टीका

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मागच्या वेळी माणूस चुकला. त्यांना निवडून दिले; पण ते बिनकामाचे निघाले. कामासाठी आम्ही त्यांच्याकडे हेलपाटे मारून दमलो. आमचं एकही काम झालं नाही, अशा शब्दांत जिल्ह्यातील विविध 76 समाज संघटनांच्या बैठकीत खा. मंडलिक यांच्यावर टीका करण्यात आली.

महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व समाजाच्या वतीने संयुक्त मेळावा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये बुधवारी झाला. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. सतेज पाटील होते. एवढ्या मोठ्या संख्येने सर्व समाज, संस्था, संघटना एकत्र येण्याचा प्रयोग फक्त कोल्हापुरातच यशस्वी होऊ शकतो, हे आजच्या मेळाव्याने दाखवून दिले आहे. या ताकदीचा उपयोग प्रत्येक समाजाने करावा, असे आवाहन माजी आमदार मालोजीराजे यांनी केले. विरोधकांना निकाल समजला असल्यामुळे ते आता शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. त्यांना त्यांची जागा या निवडणुकीत दाखवावी, असे मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.

गेल्यावेळी निवडून दिलेला माणूस चुकला, ही चूक यावेळी सुधारली जाईल असे वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे यांनी सांगितले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी गद्दारांना मतदान नाही असे शिवेसेनेने ठरविले असल्याचे सांगितले. आ. पाटील यांनी, दि. 16 रोजी शाहू महाराज यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दसरा चौकात सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले. याावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, बाबुराव तारळी, प्रजासत्ताकचे दिलीप देसाई, कॉमन मॅनचे बाबा इंदुलकर, बबन कावडे, डी. बी. लोहार, संजय मोहिते, यशवंत पाटील, प्रकाश गोमाणे, दीनानाथ कदम, सुनीता पाटील, अनिल माळी आदींची भाषणे झाली.

Back to top button