कोल्हापूरला उष्णतेच्या लाटेचा तडाखा; ‘इस्रो’च्या ‘हॉट वेदर आऊटलूक’मध्ये कोल्हापूर ग्रे झोनमध्ये | पुढारी

कोल्हापूरला उष्णतेच्या लाटेचा तडाखा; ‘इस्रो’च्या ‘हॉट वेदर आऊटलूक’मध्ये कोल्हापूर ग्रे झोनमध्ये

आशिष शिंदे

कोल्हापूर : देशभरात उष्णतेच्या लाटेचा अक्षरशः कहर सुरू आहे. या उष्णतेच्या लाटेचा कोल्हापूरला बसलेला तडाखा ‘इस्रो’च्या ‘हॉट वेदर आऊटलूक’ सॅटेलाईट इमेजेसने टिपला आहे. ‘हॉट वेदर आऊटलूक’नुसार, गेल्यावर्षी कोल्हापुरात तापमान 35 ते 37.5 या ग्रीन झोनमध्ये होते, यंदा यामध्ये वाढ होऊन तापमान 37.5 ते 40 अंशांच्या ग्रे झोनमध्ये पोहोचले आहे. गेल्या 50 वर्षांत अशा 41 उष्णतेच्या लाटांचा कोल्हापूरला फटका बसला आहे.

‘इस्रो’च्या ‘हॉट वेदर आऊटलूक’मध्ये सॅटेलाईट इमेजेसवरून उष्णतेच्या लाटेची स्थिती समजते. यामध्ये 20 ते 29, 29 ते 33, 33 ते 35, 35.5 ते 37.5, 37.5 ते 40, 40 ते 42.5 व 45 ते 47.5 असे झोन करण्यात आले आहेत. ‘हॉट वेदर आऊटलूक’नुसार महाराष्ट्रासह कोल्हापुरात गतवर्षीच्या तुलनेत तापमानात वाढ झाल्याचे समोर आले आहे. 10 एप्रिल 2023 रोजी तापमान 35 ते 37.5 अंशांच्या झोनमध्ये होते. मात्र, यंदा (दि. 10) तापमान 37.5 ते 40 अंशांच्या झोनमध्ये आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, गेल्या 50 वर्षांत कोल्हापूरला 41 वेळा उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला आहे. यामध्ये एप्रिल महिन्यात 4 वेळा उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला आहे. मे महिन्यामध्ये 7 वेळा, जून व जुलै महिन्यात 15 वेळा उष्णतेच्या लाटेचा तडाखा कोल्हापूरला बसला आहे.

Back to top button