Lok Sabha Election 2024 : राधानगरीत गटा-तटांच्या राजकारणाची चलती | पुढारी

Lok Sabha Election 2024 : राधानगरीत गटा-तटांच्या राजकारणाची चलती

गारगोटी : गत लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांचे प्रबळ गट बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आताच्या निवडणुकीत खा. संजय मंडलिक यांच्यासाठी एकत्र आले आहेत, तर गतवेळी विरोधात असलेले सत्यजित जाधव, जीवन पाटील, मोरे गट हे सतेज काँग्रेस, शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचाराला लागले आहेत. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचा मंडलिक यांच्याशी दोस्ताना असला तरी त्यांनी अद्याप पत्ते खुले केलेले नाहीत. त्यामुळे या गटा-तटाच्या राजकारणात रमलेल्या राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील मतदार कोणाच्या पारड्यात दान टाकणार, याबाबत उत्सुकता आहे.

राधनागरी धरणाची शाहू महाराजांनी केलेली उभारणी, संभाजीराजे व त्यांच्या घराण्याचा असलेला संपर्क, गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी शाहू महाराजांच्या प्रचारासाठी घेतलेली उघड भूमिका, भोगावती काठावरील नेत्यांवरील आ. पी. एन. पाटील यांची पकड याचा फायदा शाहू महाराजांना होण्याची शक्यता आहे, तर आ. आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यात केलेली विकासकामे, मंडलिक यांनी अनेक गावांसाठी दिलेला निधी, माजी आ. पाटील यांनी बिद्रीच्या माध्यमातून केलेली जोडणी याचा लाभ मंडलिक यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

भुदरगड तालुक्यात आ. आबिटकर व माजी आ. के. पी. पाटील यांचा प्रबळ गट मंडलिकांना मताधिक्य मिळवून देईल. तसेच आ. सतेज पाटील यांचा मौनी विद्यापीठाच्या माध्यमातून व संभाजीराजे यांचाही मराठा आरक्षण लढ्याच्या माध्यमातून प्रमुख कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क शाहू महाराजांसाठी लाभदायक ठरण्याची चिन्हे आहेत.

आजरा जिल्हा परिषद मतदारसंघात आ. आबिटकर गटाचे संजय पाटील, अशोक चराटी, माजी आ. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई व ना. मुश्रीफ यांची रसद मंडलिक यांना मिळेल, तर जयवंतराव शिंपी, मुकुंद देसाई, उमेश आपटे, गोकुळ संचालिका अंजना रेडेकर, संभाजी पाटील (उबाठा) यांची रसद शाहू महाराज यांना मिळणार आहे.

मंडलिक यांचा मतदारसंघात संपर्क नसल्याची टीका, ‘बिद्री’च्या निवडणुकीत मंडलिक यांनी के. पी. पाटील यांच्या विरोधातील आघाडीचे केलेले नेतृत्व याला छेद देऊन के. पी. पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांना कंबर कसून कामाला लागावे लागणार आहे.

बिद्री कारखाना निवडणुकीत खा. मंडलिक यांनी आ. आबिटकर यांची पाठराखण केल्यामुळे के. पी. पाटील यांच्या कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर होता; मात्र दोनच दिवसांपूर्वी मंत्री मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन संजय मंडलिक यांचा विजय महत्त्वाचा आहे, अशी तरटणी दिल्याचे समजते.

Back to top button