सतेज पाटील नसले, तरी मुश्रीफ – महाडिक सोबत : खा. संजय मंडलिक | पुढारी

सतेज पाटील नसले, तरी मुश्रीफ - महाडिक सोबत : खा. संजय मंडलिक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी निश्चित असल्याचे आपण सुरुवातीपासून सांगत होतो. त्यामुळे अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी होती. ती आता पूर्ण झाली असल्याने अतिशय विश्वासाने सर्व प्रचार यंत्रणा कामाला लागेल. गेल्यावेळी आपल्या सोबत आ. सतेज पाटील होते. यावेळच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह खासदार धनंजय महाडिक आहेत. केवळ हिंदुत्व नव्हे, तर पंतप्रधान मोदी यांच्या विकासाचे हिंदुत्व घेऊन लोकांसमोर जाणार असल्याचे खा. संजय मंडलिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना खा. मंडलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, उमेदवारीसंदर्भात जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांकडून मतदारसंघातील वस्तुस्थितीची माहिती घेतली. या सर्व नेत्यांनी महायुतीचा उमेदवार निवडून येण्यात काही अडचण नाही, फक्त उमेदवारी अधिकृतपणे लवकर जाहीर करावी, अशी विनंती केली होती. उमेदवारी जाहीर झाल्यामुळे प्रचार यंत्रणा अतिशय विश्वासाने एकत्रपणे कामाला लागणार आहे. त्यामध्ये कोणतीही अडचण नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील प्रचार यंत्रणा कशी गतिमान करायची, कशा पद्धतीने पुढे जायचे यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे.

शाहू महाराज यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. आमचाही ते आदर करतात. लोकसभेची ही लढाई शाहू महाराज आणि मंडलिक कुटुंबीयांची नाही. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाडींची लढाई आहे. असे सांगून मंडलिक पुढे म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून आपण प्रचारातच आहोत. उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता सर्व पक्षाच्या पदाधिकार्‍यांना घेऊन गावोगावी जाणे महत्त्वाचे आहे. असेही ते म्हणाले.

निवडणुकीच्या राजकारणातील संदर्भ प्रत्येकवेळी तसेच राहतील, असे नाही. त्यामुळे गेल्यावेळी सतेज पाटील माझ्यासोबत होते आता ते आपल्यासोबत नसले, तरी यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक सोबत आहेत. असे सांगून विरोधकांनी प्रचारात आघाडी घेतल्याच्या दाव्याबाबत बोलताना ते म्हणाले, उमेदवारी जाहीर होण्यास फार वेळ लागला असे वाटत नाही. योग्य वेळी उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर होताच खा. मंडलिक यांच्या स्वागतासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी झाली होती.

Back to top button