सोन्याच्या दराचा विक्रमी उच्चांक | पुढारी

सोन्याच्या दराचा विक्रमी उच्चांक

नवी दिल्ली/कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सोन्याच्या दर पातळीने मंगळवारी उच्चांक गाठला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्यात तोळ्यामागे (10 ग्रॅम) 924 रुपयांनी दरवाढ झाली आहे. सोन्याचा दर तोळ्यामागे 64 हजार 404 रुपये झाला आहे. कोल्हापूरच्या स्थानिक बाजारात सोन्याचा दर 66 हजार 500 रुपये तोळ्यावर गेला आहे. हा दर जीएसटी धरून आहे.

याआधी 4 डिसेंबर रोजी सोन्याने दराचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. सोन्याची किंमत तेव्हा तोळ्यामागे जीएसटी वगळता 63 हजार 805 रुपये झाली होती. चांदीच्या दरातही मंगळवारी मोठी वाढ झाली. चांदीत किलोमागे 1 हजार 261 रुपयांनी वाढ झाली असून, चांदीचा दर 72 हजार 38 रुपये किलो झाला आहे. याआधी चांदीचा दर 70 हजार 777 रुपये किलो होता. स्थानिक बाजारात जीएसटी धरून चांदीचा दर 74 हजार 400 रुपये किलोवर गेला आहे.

गतवर्षी 4 डिसेंबर रोजी चांदीनेही आपला सर्वकालीन उच्चांक गाठला होता. चांदी तेव्हा 77 हजार रुपयांवर गेली होती.

जिल्ह्यात दिवसात 1,300 रु.ने वाढ

ऐन लग्नसराईत कोल्हापूर बाजारपेठेत सोने दराने नवा उच्चांक गाठला आहे. मंगळवारी (दि. 5) 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 64 हजार 600 रुपयांवर गेला. त्यामध्ये जीएसटी अधिक केल्यास ग्राहकांना प्रत्यक्षात 66 हजार 500 रुपये मोजावे लागत होते. सोमवारी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी ग्राहकांना जीएसटीसह 65 हजार 200 रुपये मोजावे लागत होते. त्यात एकाच दिवसात तब्बल 1,300 रुपयांची वाढ झाली. सायंकाळी 66 हजार 500 या दराची नोंद झाल्यानंतर रात्री पुन्हा त्यात 300 रुपयांची वाढ झाल्याचे कोल्हापूर सराफ असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.

चांदीच्या दरातही सोमवारच्या तुलनेत 1,300 रुपयांची वाढ झाली. सोमवारी जीएसटीसह चांदीचा प्रतिकिलो दर 73 हजार 100 रुपये होता. तो मंगळवारी 74 हजार 400 रुपये झाला आहे. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील आणखी एक बँक बुडाल्यामुळे सोन्या-चांदीचे दर गेल्या तीन दिवसांत वाढत असून, सोन्याच्या दराने सर्वकालिक उच्चांक केला आहे, असे कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी सांगितले.

Back to top button