सावधान! दोन रुपये पाठवाल; पण कोट्यवधींची माया गमवाल! | पुढारी

सावधान! दोन रुपये पाठवाल; पण कोट्यवधींची माया गमवाल!

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : विनासायास कमाई आणि महागड्या गिफ्टच्या बहाण्याने उद्योजक, व्यावसायिकांसह अन्य घटकांवर भुरळ घालून बँक खात्यातील रोकडवर दरोडे घालण्याचा ऑनलाईन फंडा सुरू आहे. तांत्रिक दोष पुढे करून कळत-नकळत आधार, पॅन कार्ड, ओटीपी लिंकद्वारे ऑनलाईन लुटण्याचा उद्योग कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात वाढू लागला आहे.

देश-विदेशांतर्गत डिलिव्हरी करणाऱ्या कुरिअर कंपनीच्या नावांशी साधर्म्य असलेल्या एकाने – फसवणुकीद्वारे गंडा घालण्याचा प्रयत्न चालविला असल्याची चर्चा आहे. संकेतस्थळावर बनावट पेजद्वारे ट्रॅकिंगची अतिरिक्त माहिती सर्च केली जाते. संबंधित फर्म, व्यावसायिकांशी मोबाईलवर संपर्क साधण्यात येतो. लोकेशन करेक्ट नसल्याने पार्सलची डिलिव्हरी करू शकणार नाही. लोकेशन करेक्ट करण्यासाठी काय करावे लागेल, असा पार्सलच्या प्रतीक्षेत असणाऱ्याकडून प्रश्न होताच संबंधिताकडून सांगण्यात येते, आपण तुम्हाला लोकेशन करेक्ट करण्यासाठी मदत करू शकतो. मात्र आपणाकडून पाठविण्यात येणाऱ्या लिंकवर दोन रुपये फी भरावे लागतील. दोन रुपयांची बाब अगदीच नगण्य असल्याने साहजिकच संबंधित व्यावसायिकाकडून लागलीच पूर्तता होते आणि त्याचाच गैरफायदा घेत ऑनलाईनद्वारे लुटीचा फंडा चालविला जातो. https:// doortodoordelivery2. wixsite.com/ charge. pay या संकेतस्थळावरून एका कथित कुरिअर कंपनीच्या सराईतांनी बाजारच मांडला आहे. मोठी उलाढाल असणाऱ्या व्यावसायिक फर्म, मालक व भागीदारांना टार्गेट करून संबंधितांशी मोबाईल अथवा ऑनलाईनद्वारे थेट संपर्क साधला जात आहे.

लिंक पे दो रुपया, आधार कार्ड और ओटीपी का तपशील तुरंत भेजो!

संकेतस्थळावरून कुरिअर कंपनीमार्फत ग्राहक असलेल्या व्यावसायिकांशी मोबाईलवरून संपर्क साधण्यात येतो. आप का कुरिअर डिलिव्हरी है. लेकिन पिनकोड गलत है… हम लिंक भेजते है… उसपर आधार, पॅन कार्ड का क्रमांक भेजो… लिंक पे दोन रुपया ऑनलाईन करने के बाद ओटीपी का तपशील दीजिए… फिर आप के पते पे डिलिव्हरी पहुंच जायेगी…

उलाढालीचा सातबारा संशयितांच्या हातात!

संशयिताच्या बोलण्यावर विश्वास ठेवून व्यावसायिक कळत-नकळत ओटीपीचा क्रमांक सांगून टाकतो आणि हीच चूक संकटाची ठरते. आधार, पॅन कार्डवरील गोपनीय, ओटीपीची माहिती दिल्यास व्यावसायिकासह त्यांच्या फर्मच्या उलाढालीचा सातबारा कंपनीच्या हाताला लागतो आणि क्षणार्धात बँक खात्यावरील सारी पुंजी गायब होते.

Back to top button