नवी राष्ट्रवादीही सबकुछ मुश्रीफच | पुढारी

नवी राष्ट्रवादीही सबकुछ मुश्रीफच

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्षपदावरून ए. वाय. पाटील यांची अखेर उचलबांगडी करत बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची निवड करून हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीवरील आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. मुश्रीफ यांच्या वर्चस्वावरून मूळच्या राष्ट्रवादीत वाद झाला. आता येथे मुश्रीफ यांचा मार्ग विनाअडथळा असला तरी त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचा अजित पवार गट रुजविण्याचे आव्हान आहे.

काँग्रेसमध्ये फूट पाडून राष्ट्रवादीची स्थापना केलेल्यांमध्ये हसन मुश्रीफ हे आघाडीवर होते. सन 1999 मध्ये सदाशिवराव मंडलिक यांच्या बरोबरीने दिग्विजय खानविलकर, बाबासाहेब कुपेकर, निवेदिता माने आदी राष्ट्रवादीत सहभागी झाले होते. मुश्रीफ हे त्यावेळीच राष्ट्रवादीत दाखल झाले आणि आमदारही झाले. पुढे मंडलिक यांचे राष्ट्रवादीवर वर्चस्व वाढले आणि मुश्रीफ यांचेही पक्षात वजन वाढले. ते एवढे वाढले की, मोतीबाग तालमीच्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी मुश्रीफ यांचा उल्लेख राजकारणतील हिंदकेसरी असा केला. पुढे या हिंदकेसरींनी आपले वस्ताद शरद पवार यांनाच धक्का देऊन अजित पवार यांच्याबरोबर जाणे पसंत केले.

अजित पवार यांच्या गटात जाण्यापूर्वी राजकीय त्रास काय असतो, याचा अनुभव त्यांनी घेतला. आज अजित पवार गटाचे ते जिल्ह्यातील सर्वेसर्वा आहेत. जिल्ह्यात अंतर्गत गटबाजीतून दोन खासदार, पाच आमदार व तीन मंत्री अशी ताकद असलेली राष्ट्रवादी आता केवळ दोन आमदारांवर आली आहे. हसन मुश्रीफ व राजेश पाटील हे दोघेही आमदार अजित पवार गटात आहेत. शरद पवार यांच्या पक्षाची पाटी कोरी आहे. आता मुश्रीफ यांच्यावर अजित पवार राष्ट्रवादीची मदार आहे. त्यांना व राजेश पाटील यांना स्वत: निवडून येऊन जिल्ह्यात राष्ट्रवादी रुजवायची आहे. त्यांचा पहिला कस लोकसभा निवडणुकीतच लागणार आहे. त्याचबरोबर विधानसभेसाठी नवे चेहरे शोधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. महायुतीतील नेत्यांची तोंडे परस्परविरोधी असल्याने रुसवे आणि फुगवे काढण्यातच नेत्यांचा वेळ जाणार आहे.

ए. वाय. पाटील हे राजकारणातील बडे नाव; पण त्यांना जाता जाता पदावरून हटवून मुश्रीफ यांनी आपली ताकद दाखवून दिली. मुश्रीफ यांचे सख्खे मित्र के. पी. पाटील हे ए. वाय. पाटील यांचे मेहुणे. के.पी. व ए. वाय. यांच्यात सुप्त संघर्ष होता. दरवेळी त्यावर फुंकर घातली जात असे. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत त्यांचे मार्ग वेगळे झाले, तेव्हा मुश्रीफ यांची ए. वाय. पाटील यांच्यावर आपली माया होती; मात्र ही माया आता पातळ झाल्याचे सांगितले, तर टोकाचा विरोध सुरू झाला तेव्हा मुश्रीफ यांनी ए. वाय. पाटील यांना मोकळे केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा देत तो खरा करून दाखविला. आता त्या दोघांसाठीही काळ कसोटीचा आहे. मुश्रीफ यांच्याकडे पालकमंत्रिपद आहे. त्यामुळे या पदाचा वापर ते पक्ष संघटना वाढविण्यासाठी करतील, तर ए. वाय. पाटील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष असतील.

मुश्रीफ-आसुर्लेकर सख्य… विरोध… एकी!
हसन मुश्रीफ व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्यात पूर्वी चांगले सख्ख्य होते. यातूनच हसन मुश्रीफ यांचे एकहाती वर्चस्व असलेल्या जिल्हा बँकेने आसुर्लेकर अध्यक्ष असलेल्या दत्त आसुर्ले कारखान्याला मदतीचा हात कधी आखडता घेतला नाही; मात्र पुढे एका वळणावर या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाबासाहेब आसुर्लेकर यांनी थेट मुश्रीफ यांच्याविरोधात दंड थोपटले व विजयाचा गुलालही उधळला. आता पुन्हा मुश्रीफ व आसुर्लेकर एकत्र आले आहेत.

मुश्रीफ-कोरे मैत्रीचे काय?
हसन मुश्रीफ व विनय कोरे हे कोणत्याही पक्ष वा आघाडीत असले तरी त्यांच्यातील सख्य सर्वांनाच माहीत आहे. तसाच कोरे व आसुर्लेकर यांचा वादही जिल्ह्याला माहीत आहे. आसुर्लेकर व कोरे हे एकाच विधानसभा मतदारसंघातील आहेत. तसेच हे सर्वजण आता महायुतीचे घटक आहेत. त्या पार्श्वभुमीवर आसुर्लेकर यांच्या निवडीने मुश्रीफ कोरे मैत्रीचे काय? असा सवाल विचारला जात आहे. कारण जिल्हा बँकेत आघाडी करताना आसुर्लेकर यांना उमेदवारी द्यायची नाही, असा आग्रह विनय कोरे यांनी धरला होता. त्यातूनच आसुर्लेकर यांनी सवतासुभा मांडला व ते निवडून आले.

Back to top button