लोकसभा निवडणूक : शेट्टी आखाड्यात, राजेंची चाचपणी… मुश्रीफ यांची एनओसी | पुढारी

लोकसभा निवडणूक : शेट्टी आखाड्यात, राजेंची चाचपणी... मुश्रीफ यांची एनओसी

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नसल्या तरी कोल्हापुरात होणार्‍या सभा, कार्यक्रम, मेळावे यातून होणारी नेत्यांची भाषणे निवडणुका उंबरठ्यावर आल्याची जाणीव करून देत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला लागा, असे सांगून आखाड्यात उडी घेतली आहेे. तर संभाजीराजे यांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी बोलविलेल्या बैठकीत संभाजीराजे यांनी लोकसभेच्या आखाड्यात उतरावे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. महायुतीच्या घटक पक्षांच्या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा या शिंदे शिवसेनेकडे असल्याने त्या त्यांच्याकडेच जातील, असे जाहीरपणे सांगितले आहे.

कोल्हापूर जिल्हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. कोल्हापूर व हातकणंगले या दोन मतदारसंघांतून कमालीची चुरस आहे. ती महायुतीत आहे तशीच महाविकास आघाडीतही आहे. कोल्हापूरचे सर्वांगीण महत्त्व लक्षात घेऊन भाजपने कोल्हापूरची जागा प्रतिष्ठेची केली आहे. जागा मिळालीच तर भाजपचे उमेदवारही तयार आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे वाढते दौरे त्याची साक्ष देत आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये गटबाजी असली व त्याचे उघड प्रदर्शन होत असले तरी अलीकडेच झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजपमधील एकीचे प्रदर्शन घडले.

महायुतीचा मेळावा झाला, जिल्ह्यातील दोन्ही खासदार महायुतीचे निवडून आणण्याचा निर्धार झाला. मात्र मेळावा संपला आणि पत्रकारांशी बाोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर व हातकणंगले या लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे असून त्या त्यांनाच देण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. यातून मुश्रीफ यांनी अनेक बाबी साध्य केल्या आहेत. मुळात अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यात दोन आमदारांपुरता मर्यादित आहे. लोकसभेला त्यांच्याकडे उमेदवार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी शिवसेना शिंदे गटाला जणू लोकसभा उमेदवारीची एनओसीच दिली आहे.

राजू शेट्टी यांनी त्यांच्या हातकणंगले मतदारसंघातून शिवार ते संसद हा प्रवास पुन्हा जोमाने सुरू करण्याच्या निर्धार केला आहे. त्यासाठी त्यांनी आखाड्यात उडी घेतली आहे. गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातील उसाचा हिशेब करून त्याचे पैस ऊस उत्पादकांना मिळवून देण्यात त्यांना यश आले आहे. महायुती व महाविकास आघाडीपासून समान अंतर कायम राखत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. मात्र मतदारांना शेवटच्या क्षणी शेट्टी हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून समोर येतील, असे वाटत आहे. शेट्टी यांच्या अलीकडच्या काळातील भेटीगाठी या शक्यतेला पुष्टी देणार्‍या आहेत. तसे झाले तर राजू शेट्टी हे शिवसेनेच्या कोट्यातून महायुतीचे उमेदवार होऊ शकतात. कारण हातकणंगलेच्या जागेवर शिवसेनेचे धैर्यशील माने निवडून आले असून त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्या राजू शेट्टी महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले तर त्यांची उमेदवारी शिवसेना ठाकरे गटातून असेल.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे लोकसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा आहे. नाशिकमधून ते निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. मात्र त्यांच्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी बोलविलेल्या बैठकीत संभाजीराजे यांनी लोकसभेच्या आखाड्यात उतरावे, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे कोल्हापुरातून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभेची राजकीय पेरणी

महायुतीतील घटक पक्षांचा मेळावा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा, संभाजीराजे यांच्या वाढदिवस पूर्वतयारीचा मेळावा, गोकुळमध्ये 17 लाख लिटर दूध संकलनाचा कार्यक्रम या सगळ्या कार्यक्रमातून नेत्यांचीझालेली भाषणे ही लोकसभेची राजकीय पेरणी करणारीच ठरली.

Back to top button