कोल्हापूर : माजी नगरसेविकेच्या पुत्राची दहशत; तलवार, एअरगन रोखल्याने दिला चोप | पुढारी

कोल्हापूर : माजी नगरसेविकेच्या पुत्राची दहशत; तलवार, एअरगन रोखल्याने दिला चोप

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राजारामपुरी परिसरातील एका माजी नगरसेविकेच्या पुत्राने सागर माळ येथील रेड्याच्या टकरीजवळील मैदान परिसरात रविवारी रात्री दहशत माजविली. मद्यधुंद अवस्थेत तलवारीसह एअरगन रोखण्याचा प्रकार घडल्याने संतप्त जमावाने पुत्राची धुलाई केली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील तलवार व एअरगन हस्तगत करण्यात आले आहे.

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने राजारामपुरी पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांसह पोलिसांनी धाव घेतली. सौम्य लाठीहल्ल्यानंतर तणाव निवळला. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संशयिताविरुद्ध रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, मद्यधुंद अवस्थेत माजी नगरसेविका यांचा पुत्र मित्रासमवेत घटनास्थळी आला. तेथे उपस्थित असलेल्या चार ते पाच तरुणांशी वादावादी झाली. प्रकरण हातघाईवर आले. तरुणांनी पुत्राला चोपमार दिला.

मारहाणीनंतर नगरसेविका पुत्र घराकडे पळत सुटला. घरातून तलवार आणि एअरगन आणून रोखण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण होताच अधिकारी, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सौम्य लाठीहल्ल्यानंतर पुत्राने काही जणांना धक्काबुक्की केली. यावेळी संशयिताकडून एअरगन रोखण्याचा प्रयत्न झाल्याचा जमावाकडून आरोप करण्यात आला. पोलिसांनी एअरगनसह तलवार हस्तगत केली आहे.

राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे म्हणाले, तरूणाला दुचाकी देण्याच्या कारणातून संशयिताकडून झालेल्या मारहाणीनंतर गोंधळाचा प्रकार घडला आहे. धक्काबुक्की अथवा पोलिसांच्या दिशेने एअरगन रोखल्याचा प्रकार घडल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. चौकशीअंती संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Back to top button