‘बिद्री’त के. पी. पाटील यांची हॅट्ट्रिक | पुढारी

‘बिद्री’त के. पी. पाटील यांची हॅट्ट्रिक

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री दूधगंगा-वेदगंगा साखर कारखाना निवडणुकीत के. पी. पाटील यांनी हॅट्ट्रिक केली आहे. सलग तिसरा विजय मिळवित व तालुक्यातील आमदार प्रकाश आबिटकर यांना कारखाना निवडणुकीत अस्मान दाखवित के. पी. पाटील विधानसभेचे प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहेत. दोन मंत्री, दोन खासदार, दोन आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत के. पी. यांनी एकहाती बाजी मारली. हसन मुश्रीफ, सतेज पाटील, दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजय घाटगे यांचाही या विजयात मोठा वाटा आहे.

सख्खे मेहुणे ए. वाय. पाटील विरोधात गेल्यामुळे के. पी. पाटील यांना मोठा धक्का बसला, असे म्हटले जात होते. प्रत्यक्षात गेल्या काही वर्षांत ए. वाय. पाटील बंडाचे निशान फडकविणार हे स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे के. पी. पाटील कमालीचे सावध होते. संचालक मंडळातील जुने चेहरे वगळून आणि नव्या चेहर्‍यांना संधी देऊन के. पी. पाटील यांनी अक्षरशः नेतृत्वच पणाला लावले होते. ही निवडणूक के. पी. पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई होती.

‘बिद्री लय भारी’ ही के. पी. पाटील यांची टॅगलाईन याहीवेळी त्यांना साथ देणारी ठरली. कारखान्याच्या गैरकारभाराचा पाढा विरोधकांनी वाचला खरा; पण आम्हाला मिळणार्‍या दरात खोट नाही. सर्वाधिक दर मिळतो, त्यामुळे के. पी. पाटील यांच्याबरोबर राहण्याचा सभासदांनी निर्णय घेतला. खरे तर या निवडणुकीत परिवर्तन होणार, असे अंदाज व्यक्त केले जात होते; पण के. पी. पाटील हे आपणच विजयी होणार हे ठामपणे सांगत होते, तर त्यांच्या मागे आजपर्यंत सर्व ताकद उभी करणारे हसन मुश्रीफ हे तर कमालीच्या आत्मविश्वासाने ‘बिद्री’ची मतमोजणी ही केवळ औपचारिकताच राहिली आहे. आम्ही विजयाचा गुलाल उधळला आहे, एवढ्या ठामपणे सांगत होते. त्यावेळी जिल्ह्यातील दुसरे मंत्री चंद्रकांत पाटील हे बिद्री परिसरात विरोधी पॅनेलच्या प्रचारासाठी वैयक्तिक गाठीभेटी घेत होते.

एका बाजूला के. पी. पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे, दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजय घाटगे अशी मंडळी, तर दुसर्‍या बाजूला आमदार प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे असा जंगी सामना झाला. विरोधकांनी मोट चांगली बांधली. पॅनेलला नावही परिवर्तन दिले. मात्र, प्रत्यक्षात ते परिवर्तन करू शकले नाहीत. हे परिवर्तन आपण का करू शकलो नाही, याचा त्यांचे नेते विचार करतीलच. कारण, हीच सगळी मंडळी लोकसभा आणि विधानसभेच्या रिंगणात दिसणार आहेत.

के. पी. पाटील यांनी प्रचाराची सूत्रे एकहाती ठेवत शांतपणे आपल्यावरील आरोपांना सडेतोड उत्तर दिले. ‘बिद्री’ची हवा बदलत नाही, असे लक्षात येताच परिवर्तन पॅनेलमधील काही मातब्बर उमेदवारांकडून सिंगल व्होटिंगचा प्रचार सुरू करण्यात आला. त्याचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आणि हा प्रचार ‘बिद्री’च्या सत्ताधार्‍यांनी बरोबर कॅच केला.

निवडणूक मतदान आणि निकाल हे होण्यापूर्वीच ए. वाय. पाटील आणि आमदारांचे बंधू अर्जुन आबिटकर यांच्यात कारखाना अध्यक्षपदावरून वाद झाल्याची चर्चा सुरू झाली. हा वाद झाला की नाही, हे त्या दोघांशिवाय कोणालाही माहीत नाही. मात्र, चर्चा एवढी रंगली की, त्याचा फटकाही परिवर्तन पॅनेलला बसला.

हसन मुश्रीफ यांनी के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्यात तडजोड घडवून आणण्यासाठी एक मसुदा तयार केल्याचे सांगितले जाते. त्यानुसार ए. वाय. पाटील यांना एक वर्ष कारखान्याचे अध्यक्ष करायचे ठरले होते. मात्र, निवडणुकीनंतर पहिल्याच वर्षी आपल्याला अध्यक्षपद हवे यावर ए. वाय. ठाम होते. मुश्रीफ यांनी के. पी. पाटील यांचा चेहरा घेऊन आपण निवडणुकीला पुढे जात आहे. त्यामुळे त्यांना अध्यक्षपद द्यावे लागेल, अशी भूमिका मांडली. नंतरच्या वर्षी ए. वाय. यांना अध्यक्षपद देता येईल, असे सुचविले. हा तोडगा सत्तारूढ आघाडीच्या प्रचार शुभारंभाच्या प्रचार सभेतच जाहीर करायचा होता. मात्र, त्यापूर्वीच ए. वाय. पाटील विरोधी आघाडीत दाखल झाले होते. ए. वाय. पाटील यांच्याकडून उमेश भोईटे आणि राजू पाटील यांना वगळण्याची अट घातल्याचे सांगितले जाते. या दोघांना वगळणे के. पी. पाटील यांना शक्य नव्हते. तेथेच ऐक्य तुटले.

कागलमध्ये असलेल्या 17 हजारांवर मतांमध्ये के. पी. पाटील गटाने अडीच हजारांची आघाडी घेतली, तर राधानगरीत 17 हजार मतांमध्ये ए. वाय. पाटील यांनी सुमारे दोन ते अडीच हजार मतांची आघाडी घेतली. मात्र, सोळांकूर या ए. वाय. पाटील यांच्या राखीव पट्ट्यातच त्यांच्या आघाडीला 100 ते 150 मते कमी मिळाली याचा विचार त्यांना करावा लागणार आहे. पुढच्या राजकारणात वाटचाल करण्यासाठी आबिटकर आणि ए. वाय. पाटील हे याचा विचार नक्कीच करतील. याशिवाय पुढचे राजकारण आकाराला येणार नाही.

कागलमध्ये के. पी. पाटील, हसन मुश्रीफ यांनी लावलेल्या जोडण्या संजय मंडलिक आणि समरजितसिंह घाटगे यांना मोडता आल्या नाहीत. ज्या आक्रमकपणे के. पी आणि मुश्रीफ कागलमध्ये या निवडणुकीला सामोरे गेले त्याचा फायदा त्यांना मताधिक्यात मिळाला.

कागल, करवीर, राधानगरी आणि भुदरगड या चार तालुक्यांत सभासद असलेला हा मोठा कारखाना आहे. येथील राजकारणाचा या चार तालुक्यांतील राजकारणावर परिणाम होतो. सध्या तरी आबिटकर यांना कारखान्याच्या मैदानात के. पी. पाटील यांनी अस्मान दाखविले आहे. असेच राजकारण पुढे सुरू राहील, असे सांगता येत नाही. ते नेहमी बदलत असते. मात्र, या विजयाने के. पी. पाटील यांना विधानसभेसाठी प्रबळ दावेदार म्हणून समोर आणले आहे. ए. वाय. पाटील आता आबिटकर गटात आहेत. भाजपचा भुदरगड तालुक्यातील गट आणि आबिटकर यांचे विळ्या भोपळ्याचे सख्य आहे. त्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील हे पुढच्या राजकीय जुळणीसाठी ज्या जोडण्या लावणार त्यावरच येथील विधानसभेचे राजकारण आकाराला येणार आहे.

आता चौकशी लागणार का?

बिद्री कारखान्याचे चाचणी ऑडिट करण्यावरून आमदार प्रकाश आबिटकर व के. पी. पाटील यांच्यात टोकाचे आरोप-प्रत्यारोप झाले होते. या वादात हसन मुश्रीफ यांनी उडी घेत चंद्रकांत पाटील हे ज्या सरकारमध्ये मंत्री आहेत, त्या सरकारमध्ये आपणही मंत्री आहोत. त्यामुळे चंद्रकांत पाटील या कारखान्याची चौकशी लावणार का, असा सवाल केला होता. आता निकाल जाहीर होताच कारखान्याच्या कारभाराची चौकशी विरोधी आघाडी लावणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

माजी आमदारांची यंग ब्रिगेड

माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे चिरंजीव सत्यजित, बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहुल आणि नामदेवराव भोईटे यांचे चिरंजीव उमेश हे कारखान्यात संचालक म्हणून निवडून आले. माजी आमदारांची ही यंग ब्रिगेड ‘बिद्री’त चर्चेचा विषय ठरली आहे.

‘बिद्री’तही नातीगोती

सत्तारूढ श्री महालक्ष्मी आघाडीचे प्रमुख के. पी. पाटील, संचालक सुनीलराव सूर्यवंशी व गणपतराव फराकटे हे परस्परांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे ‘भोगावती’पाठोपाठ ‘बिद्री’तील नातीगोती चर्चेत आली आहेत.

नेत्यांना जमले वारसांना नाही

दिनकरराव जाधव कारखान्याचे सर्वेसर्वा असताना तालुक्यातील विरोध विसरून सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे या दोन नेत्यांनी एकत्र येत ‘बिद्री’तील सत्तेत परिवर्तन घडविले होते. त्यावेळी के. पी. पाटील यांच्या हाती सत्ता सोपविली. आता परिवर्तनासाठी या दोन्ही नेत्यांचे वारस संजय मंडलिक व समरजितसिंह घाटगे एकत्र आले होते. मात्र, त्यांना परिवर्तन जमले नाही.

Back to top button