कोल्हापूर : अपघातानंतरच्या उपचारातून बरा झाल्यानंतर 31 वर्षीय तरुणाने वर्षभरात लग्न केले. 70 वर्षीय पालकाने 41 वर्षीय मुलासाठी मुलगी शोधून त्यांचा संसार थाटला. 25 वर्षांच्या सारिकाने आयुष्याचा जोडीदार शोधून एकटेपणावर उपाय शोधला. पाच वर्षांच्या मुलीचा सांभाळ आपल्यासोबत व्हावा, या विचाराने चाळीशितील अमोलने पुन्हा लग्न केले. हे सगळेच एचआयव्ही, एडस्सह जगताहेत. त्यांनी केलेल्या विवाहाला पॉझिटिव्ह अर्थ आहे. गेल्या 16 वर्षांत राज्यात एचआयव्ही एडस्बाधित 2 हजारहून अधिक जणांची रेशीमगाठ पॉझिटिव्ह साथी डॉट कॉमने बांधली आहे.
एड्सचे निदान झाल्यानंतर त्यांच्यापैकी अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. आता पुढे काय करायचे… यासह अनेक प्रश्नांचे काहूर मनात उमटत होते. आयुष्य एकाकी बनले होते. पतीमुळे पत्नी आणि मुलांनाही लागण झाल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती, तर काहींचा काहीही दोष नसताना हा आजार जडला. समाज आणि कुटुंबीयांकडून मिळणारी दुय्यम वागणूक व प्रश्नार्थक नजरा, यामुळे त्यांचे आयुष्य अधिकच वेदनादायी बनले. अशा बाधितांना आयुष्याचा जोडीदार मिळवून देण्यासाठी राज्यभरात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वधू-वर मेळावे घेतले जात आहेत. पॉझिटिव्ह साथी डॉट कॉम ही देशातील पहिली मेट्रोमोनी वेबसाईट एडस्ग्रस्तांचे विवाह जुळवण्याचे काम करत आहे. या उपक्रमांतून 16 वर्षांत 2 हजार एचआयव्ही, एडस्ग्रस्तांना जोडीदार मिळाला. संस्थापक अनिल वळीव हे काम सामाजिक भावनेने करत आहेत. या सर्वांचा संसार सुखी सुरू असल्याचे वळीव यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले; तर जिल्ह्यातील 100 हून अधिक बाधित विवाहबद्ध झाल्याचे जिल्हा एडस् प्रतिबंधक व नियंत्रण पथकाच्या समन्वयक अधिकारी दीपा शिपूरकर यांनी सांगितले.
मेळाव्याला पुरुष एडस्ग्रस्तांची संख्या जास्त असते. मात्र, हे चित्र गेल्या सहा-सात वर्षांत बदलले असून 30-35 च्या उंबठ्यावरील या आजाराच्या महिलाही लग्नासाठी संसर्ग झालेला जोडीदार निवड आहेत.
चुकीमुळे तर कधी दोष नसतानाही एडस्ग्रस्त शब्द अनेकांच्या माथी लागतो. मात्र त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. या भावनेतून त्यांच्या पुनर्विवाहासाठी राज्यातील सामाजिक संस्था, व्यक्ती काम करत आहेत.