Diwali 2023 : जपानमधील विविध शहरात दिवाळी उत्साहात साजरी | पुढारी

Diwali 2023 : जपानमधील विविध शहरात दिवाळी उत्साहात साजरी

इचलकरंजी; पंकज चव्हाण : देशभरात मोठ्या उत्साहात दीपावली साजरी करण्यात येते. परंतु देशातील अनेक नागरिक नोकरी निमित्त जगातील कानाकोपऱ्यात राहतात. त्या-त्या देशात भारतीय मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात. जपानमधील टोकियो, हिरोशिमा, योकोहामा, कावासाकी, कोबे, क्योतो, ओसाका, उत्सुनोमिया, नागोया, सेंदाई, तमागावा, शिझुओका, टोकियो विद्यापीठ, दूतावास येथे दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जपान मधील अनेक नागरिकांनी दिवाळीचे लक्ष्मीपूजन थाटात केले. खास म्हणजे दिवाळीमध्ये फटाके उडवण्यासाठी जपान मधील प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली होती.

कोव्हिडनंतर जपानमध्ये भारतीय लोकसंख्येची वाढ झाली आहे. दिवाळी सणामध्ये जापानी तसेच इतर देशातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विविध संस्था आणि भारतीय समुदायाकडून उत्सव साजरा झाला. जपान मधील योकोहामा मंडळाने भारतातून २०० आकाशदिवे मागवले. भारतीयांच्या प्रमाणे जपानमधील भारतवासीयांनी घरांवर विद्युत रोषणाई करून तसेच आकाशदिवे लावून मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला. भारतीयांप्रमाणे तेथील नागरिकांनी सुद्धा दिवाळीच्या सणामध्ये सहभाग घेतला. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

महाराष्ट्रात जसे दिपावलीच्या फराळांची देवाण-घेवाण होते तसेच जपानमध्ये सुद्धा भारतीय नागरिकांनी फराळाची देवाण-घेवाण केली. भारतीयांप्रमाणे जापानी मित्रपरिवाराने सुद्धा भारतीय वेशभूषा केली. दिवाळीनिमित्त जपानमध्ये कोणतीही शासकीय किंवा खासगी सुट्टी जाहीर केलेली नव्हती. त्यामुळे भारतीयांनी रात्री उशिरा विविध सांस्कृतिक भारतीय कार्यक्रमांचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील काही सामाजिक कार्यकर्ते व नोकरदार तसेच उद्योगपती यांनी जपानमध्ये महाराष्ट्रातील व भारतातील सण साजरे व्हावे तसेच इतर जयंती, पुण्यतिथी व विविध कार्यक्रम उत्साहात साजरे व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत.

यासाठी जपानमधील अक्षय टोटावार, हर्षद कान्हेरे, अमोघ कुटुंबे, रणजित देसाई, विकास रंजन, संदीप गुंडप, विजय कदम, आशिष सोले, मोहित म्हसकर, कैलाश मालकानी, पद्मनाभ गलगली, कैलाश पटेल, संतोष शिंदोळकर, शुभम जयस्वाल, प्रशांत शर्मा, श्रेया यांनी दिवाळीमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमात भारतीयांनी सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्न केले.

हेही वाचा : 

Back to top button