मंगलमय दीपोत्सवाचा चैतन्य सोहळा सुरू | पुढारी

मंगलमय दीपोत्सवाचा चैतन्य सोहळा सुरू

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आकाश उजळून टाकणार्‍या फटाक्यांची आतषबाजी, आकाशकंदिलांसह नेत्रदीपक विद्युत रोषणाई, सप्तरंगी रांगोळ्या, फुला-पानांच्या माळांनी सजलेले घरदार आणि नवीन कपडे परिधान करून परस्परांना शुभेच्छा देणारे आबालवृद्ध अशा उत्साही आणि आनंदी वातावरणात रविवारी चैतन्यदायी दीपावली पर्वाचा जल्लोषात प्रारंभ झाला.

‘लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास’… या व अशा शुभेच्छा देत दीपोत्सव पर्व सुरू झाले. मध्यरात्रीच फटाक्यांच्या आतषबाजीने उत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण शहर विद्युत रोषणाईने झगमगत असून आकाशकंदील आणि लाखो दिव्यांच्या आराशीने आसमंत प्रकाशाने उजळून टाकला आहे.

अभ्यंगस्नान अन् सहकुटुंब फराळाचा अस्वाद

रविवार हा नरकचतुर्दशीचा मुख्य दिवस. घरोघरी गेल्या काही दिवसांपासून दिवाळीची तयारी सुरूच होती. महिलांनी अंगणात सप्तरंगी रांगोळ्या रेखाटल्या. संपूर्ण परिसर तेलाचे दिवे, मेणाच्या पणत्या आणि आकाशदिव्यांनी उजळला आहे.

पहाटे आबालवृद्धांनी सुवासिक तेल, उटणे लावून अभ्यंगस्नान केले. यानंतर नवीन कपडे परिधान करून घरातील कुलदैवतांचे दर्शन घेऊन थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घेत परस्परांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. युवक-युवती तसेच बालचमूंनी फटाक्यांची आतषबाजी केली. सर्वांनी एकत्रित सहकुटुंब स्वादिष्ट फराळाचा आस्वाद घेतला.

Back to top button