कोल्हापूर : थेट पाईपलाईनचे पाणी आज येणार | पुढारी

कोल्हापूर : थेट पाईपलाईनचे पाणी आज येणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : हळदी-कुर्डू या दोन गावांदरम्यान चार ठिकाणी थेट पाईपलाईनवर एअर व्हॉल्व्हला लावलेल्या फ्लँजचे नटबोल्ट अज्ञातांनी खोडसाळपाणा करून काढल्याने ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी थेट पाईपलाईनचे पाणी शहरवासीयांना मिळू शकले नाही. दरम्यान, रविवारी दिवसभर एअर व्हॉल्व्हच्या फ्लँजचे नटबोल्ट दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यामुळे सोमवारी काळम्मावाडीचे थेट पाईपलाईनचे पाणी शहरवासीयांना मिळणार आहे.

शहरवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न असलेल्या काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनचे पाणी पुईखडी येथे शुक्रवारी रात्री पोहोचले. त्यामुळे रविवारी दिवाळीच्या दिवशी शहरवासीयांना हे पाणी मिळण्याची आशा होती.

मात्र थेट पाईपलाईनवर एअर

व्हॉल्व्हला लावलेल्या फ्लँजचे नटबोल्ट चार ठिकाणी अज्ञातांनी खोडसाळपणे काढून टाकल्याने शनिवारपासून धरणातून पाणी उपसा बंद करावा लागला. परिणामी दिवाळीच्या पहिल्या दिवशी पाणी मिळू शकले नाही. हे नटबोल्ट दुरुस्तीचे काम रविवारी युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून महापालिका प्रशासनाने नटबोल्ट काढून टाकून पाईप वेल्डिंगद्वारे बंद केले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. रात्री उशिरा काम पूर्ण होताच थेट पाईपलाईनमधून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेने सर्व खबरदारी घेऊन सोमवारी शहरवासीयांना पाणी मिळेल याची व्यवस्था केली आहे. महापालिका प्रशासनाच्या नियोजनानुसार सोमवारी पुईखडी येथे पाणी येणार आहे.

Back to top button