कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : अमल की शौमिका महाडिक? | पुढारी

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : अमल की शौमिका महाडिक?

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीचा धुरळा आता उडू लागला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. महाविकास आघाडीच्याच नव्हे तर भाजपच्या नगरसेवकांनाही ते भेटत आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची यंत्रणा अद्याप उमेदवार निवडीतच गुंतली आहे. भाजपकडून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या कुटुंबातील उमेदवार निश्चित असला तरी नेमके रिंगणात उतरणार कोण, यावर मात्र अजूनही खलबते सुरू आहेत.

पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात गेल्यावेळी झालेली लढत संपूर्ण राज्यात गाजली होती. सलग तीनवेळा विधान परिषदेचे प्रतिनिधित्व करणार्‍या महाडिक यांना गेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी पराभूत केले होते. त्यानंतर लोकसभा, विधानसभा, गोकुळ अशा सलग पराभवाने महाडिक विधान परिषद निवडणुकीत उतरतील की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र भाजपच्या गोटातून महाडिक कुटुंबातीलच उमेदवार देण्यावर एकमत झाल्याचे समजते.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपतर्फे ज्या उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू झाली, त्यामध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक, सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक, राहुल आवाडे, समरजितसिंह घाटगे यांच्या नावाचा समावेश होता. मात्र प्रतिस्पर्धी उमेदवाराला टक्कर देण्याची क्षमता या निकषावर भाजपचे महाडिक कुटुंबातील उमेदवारीवर एकमत झाल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

भाजप नेतृत्वाकडे शौमिका महाडिक व अमल महाडिक या दोन नावाशिवाय सध्या अन्य पर्याय दिसत नाही. अमल महाडिक हे देखील भाजपच्या कमळ चिन्हावर आमदार म्हणून निवडून आले होते. शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढविली आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे. त्यामुळे या दोहोंपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप उमेदवारी जाहीर होऊ शकलेली नाही.

दुसर्‍या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजकीय यंत्रणा गतिमान केली आहे. त्यांनी या निवडणुकीची तयारी गेल्या वर्षभरापासूनच सुरू केली आहे. सहा महिन्यांपासून प्रत्यक्ष भेटीगाठी आहेत. निवडणुका जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. निवडणुका जाहीर होताच शहरी आणि ग्रामीण भागात काम करणार्‍या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना प्रचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते त्यांच्या सोबतीला आहेत. त्यांनीही दौरे सुरू केले आहेत.

इचलकरंजी केंद्रस्थानी

इचलकरंजी ; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीसाठी मतदारांच्या संख्येमुळे इचलकरंजी राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे. मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. प्लस व मायनस याचे आडाखे बांधतानाच नेत्यांकडूनही सावध पावले टाकण्यात येत आहेत.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी इचलकरंजी मतदारांच्या भेटीगाठीसाठी तळ ठोकला होता. दरम्यान, अमल महाडिक व त्यांच्या समर्थकांकडूनही शहरात हालचाली सुरू असून आ. प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह अन्य भाजप मित्रपक्षांशी संपर्क साधण्यात येत आहे. जि.प. सदस्य राहुल आवाडे यांनीही उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे.

इचलकरंजीत काँग्रेसचे 19 नगरसेवक असून त्यापैकी आवाडे समर्थक 14, भाजपचे 16, राजर्षी शाहू आघाडी (कारंडे गट) 11, राष्ट्रवादीतील जांभळे गटाचे 8, सागर चाळके यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीचे 13 नगरसेवक तर शिवसेनेच्या एक नगरसेविका आहेत.

नगरसेविका शोभा कांबळे यांचे निधन झाले आहे तर ताराराणी आघाडीचे नगरसेवक संजय तेलनाडे व सुनील तेलनाडे फरार आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार भाजप व आवाडे समर्थक सदस्य सतेज पाटील यांच्या विरोधात असल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे चाळके यांची ताराराणी आघाडी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदींसह अन्य काही अपक्ष सतेज पाटील यांना समर्थन देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या बलाबलानुसार दोन्हीही उमेदवारांना समसमान पाठिंबा मिळताना दिसत आहे.

‘महाविकास’कडे 39; भाजपकडे 8 मते

कागल : तालुक्यात महाविकास आघाडीकडे 39 तर भारतीय जनता पक्षाकडे 8 असे मतदारांचे बलाबल आहे. मुश्रीफ गटाचे 21, मंडलिक गटाचे 17, संजय घाटगे गटाचे एक आणि समरजित घाटगे गटाचे 8 अशी गटनिहाय मतदारांची संख्या आहे. कागल तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य 5 आणि सभापती 1, कागल नगरपालिका 22, मुरगूड नगरपालिका 19 अशी मतदार संख्या आहे.

कागल नगरपालिकेमध्ये मुश्रीफ गटाचे स्वीकृत नगरसेवकांसह 12 तर समरजित घाटगे गटाचे 10 मतदार आहेत, मात्र समरजित घाटगे गटाच्या सौ. मंगल गुरव आणि माधवी मोरबाळे यांनी मुश्रीफ गटात प्रवेश केल्यामुळे मुश्रीफ गटाची सदस्य संख्या 14 इतकी तर समरजित घाटगे गटाची संख्या 8 इतकी झाली आहे. मुरगूड नगरपालिकेत खासदार संजय मंडलिक गट 16, मुश्रीफ पाटील गटाचे 3 नगरसेवक आहेत. जि.प. सदस्य मुश्रीफ गट 3, संजय घाटगे गट 1 आणि खासदार मंडलिक गट 1 अशी संख्या आहे.

पालकमंत्र्यांची भाजपच्या माजी नगराध्यक्षांशी बंद खोलीत चर्चा

कुरुंदवाड ; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी कुरुंदवाडच्या काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या नेतेमंडळी आणि नगरसेवकांची भेट घेऊन चर्चा केली. भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या निवासस्थानी पालकमंत्री पाटील यांनी भेट घेतल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पालकमंत्री पाटील यांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन बंद खोलीत 20 मिनिटे चर्चा केल्याची चर्चा रंगली होती. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शनिवारी माजी आमदार महाडिक यांनी दौरा केल्यानंतर रविवारी पालकमंत्री पाटील यांनी शिरोळ तालुक्याचा दौरा केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, तालुकाप्रमुख वैभव उगळे, शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे आदी उपस्थित होते.

Back to top button