भोगावती कारखाना निवडणूक बिनविरोधसाठी पुढाकार घेणार : ए. वाय. पाटील | पुढारी

भोगावती कारखाना निवडणूक बिनविरोधसाठी पुढाकार घेणार : ए. वाय. पाटील

राशिवडे- पुढारी वृतसेवा : भोगावती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेणार, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. ते येळवडे (ता. राधानगरी) येथील राधानगरी व करवीर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये बोलत होते. भोगावतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नामदेव पाटील येळवडेकर होते.

पाटील म्हणाले की, कोणामुळे कारखाना बिघडला, याला कोण जबाबदार या सर्व जुन्या गोष्टी परत उकरून काढण्यापेक्षा कारखाना टिकविण्यासाठी बिनविरोध निवडणूक कशी करता येईल, तेथे सर्व विचारांची माणसे एकत्रित येऊन काम करतील असा आदर्श जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांनी घ्यावा, असे काम सर्वांना बरोबर घेऊन मी प्रयत्न करेन.

प्रास्ताविकामध्ये  गोकुळचे संचालक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. किसन चौगले कारखान्याची आर्थिक परिस्थिती बघितली तर तेथे जाण्यात काही हौस नाही. अनेकांनी सत्ता भोगली. जे जे निर्णय काही चूक, काही बरोबर होते. वेळेत साखर निर्यात झाली नाही व सरकारी धोरण मारक ठरले आहे. ही जबाबदारी एकाने घेण्यापेक्षा सर्व लोकांनी सामुदायिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कारखाना टिकविण्यासाठी पुढाकार ए वाय यांनी घ्यावा. सर्व लहान सहान पक्षांच्या बरोबर चर्चा करून तोडगा काढावा. ५८० कामगारांचा करार पूर्ण झाला असून अंमलबजावणी लवकरच होईल. बँक आँफ इंडियामधील २०० लोकांच्या नावावरील २० कोटी कर्जाचा विषय निकालात काढला आहे, असे सांगितले.

यावेळी बाजार समिती संचालक शिवाजी पाटील, भोगावतीचे माजी संचालक अविनाश पाटील, रघुनाथ जाधव, सुनील कारंडे, महादेव कोथळकर, शिवाजीकाका भाट, भोगावती शिक्षणचे अध्यक्ष जयसिंग हुजरे, कोदवडेचे धनाजी पाटील, आर. वाय. पाटील, विनय पाटील यांच्यासह राधानगरी, करवीरमधील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आभार तुकाराम सारंग यांनी मानले.

Back to top button