Kolhapur News : शहर हद्दवाढीला आमचा विरोधच; लगतच्या 18 गावांत आज बंद | पुढारी

Kolhapur News : शहर हद्दवाढीला आमचा विरोधच; लगतच्या 18 गावांत आज बंद

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरालगतच्या 18 गावांनी हद्दवाढीविरोधात एल्गार पुकारला असून, गुरुवारी या गावांत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. हद्दवाढीला विरोध दर्शवणारे निवेदन या गावांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावू, याकामी राज्य शासन अनुकूल आहे, असे जाहीर केले आहे. या एकतर्फी प्रस्तावित हद्दवाढीला आमचा विरोध आहे. पहिल्यांदा शहरातील 81 प्रभागांमध्ये आवश्यक नागरी सुविधा द्या, स्वच्छ व सुंदर कोल्हापूर करा. यानंतर आम्ही स्वतःहून शहरामध्ये समाविष्ट होण्याबाबत निर्णय घेऊ, असा सूर शहरालगतच्या गावांमध्ये आहे. विरोध करण्यासाठी गावागावांत पोस्टर लावण्यात येत आहेत. गुरुवारी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात यावेत, असे आवाहन ग्रामपंचायतींकडून करण्यात येत आहे.

सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी समितीच्या वतीने दोन दिवसांपूर्वी बैठक घेण्यात आली. या बैठकीत पु. शिरोली, नागाव, गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फ ठाणे, उचगाव, वाडीपीर, आंबेवाडी, वडणगे, शिये, शिंगणापूर, नागदेववाडी (यासह शिरोली व गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत) या 18 गावांतील सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जनजागृती करण्यासाठी सर्व व्यवहार गुरुवारी बंद करून या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. गुरुवारी होणारा बंद ही आंदोलनाची पहिली पायरी आहे, यापुढे आवश्यकतेनुसार आंदोलन तीव— करण्याची घोषणा परिसरातील गावांच्या लोकप्रतिनिधींमधून करण्यात आली आहे.

Back to top button