Kolhapur News : तोरस्करवाडी धबधब्यात गारगोटीतील युवक बुडाला | पुढारी

Kolhapur News : तोरस्करवाडी धबधब्यात गारगोटीतील युवक बुडाला

गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरातील तोरस्करवाडी येथील धबधब्यात गारगोटीतील युवक बुडाला. प्रणव भिकाजी कलकुटकी (वय 20) असे त्याचे नाव आहे. शोध घेऊनही तो सापडला नाही. अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली आहे.

गारगोटीतील चार युवक आज रविवारी सकाळी तोरस्करवाडी येथील धबधबा पाहण्यासाठी गेले होते. सर्वजण पाण्याचा आनंद लुटत असताना प्रणव अचानक गायब झाल्याचे मित्रांच्या लक्षात आले. त्यानंतर घाबरलेल्या मित्रांनी दीड किलोमीटर चालत येऊन तोरस्करवाडी येथील ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन शोध घेतला. राधानगरी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

घटनेची माहिती समजताच गारगोटीतील युवकांनी थेट तोरस्करवाडी येथे धाव घेतली. माजी सरपंच अरुण शिंदे, अजित खिलारी, रणजीत बोटे यांनी पाण्यात उतरून काठीने शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा शोध लागला नाही. पावसाचा जोर आणि पाण्याच्या वाढता प्रवाह यामुळे शोध कार्यात अडथळा येत होता. रात्री अंधार झाल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली. कोल्हापूर येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात येणार असून सोमवारी सकाळपासून शोध मोहीम पुन्हा राबविण्यात येणार आहे.

प्रणवचे वडील गवंडी काम करत आहेत. तो इस्लामपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता. गणेशचतुर्थीनिमित्त गावी आला होता. त्याच्या पाठीमागे आई-वडील व दोन बहिणी आहेत.

Back to top button