सूर्यवंशी गँगच्या म्होरक्यासह ६ गुन्हेगारांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई | पुढारी

सूर्यवंशी गँगच्या म्होरक्यासह ६ गुन्हेगारांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : विचारेमाळ, सदर बाजार, कनाननगर परिसरात फाळकूटदादांची टोळी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सूर्यवंशी गँगच्या म्होरक्यासह 6 सराईतांवर सोमवारी ‘मोका’अंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली. दरम्यान, टोळीतील अन्य फरारी संशयितांच्या अटकेसाठी छापासत्र सुरू झाले आहे.

‘मोका’अंतर्गत कारवाई झालेल्यांत म्होरक्या ऋत्विक अमर सूर्यवंशी, अनिकेत अमर सूर्यवंशी, आदित्य ऊर्फ गब्या अमर सूर्यवंशी, रोहन ऊर्फ सोन्या किशोर सूर्यवंशी, परशुराम ऊर्फ बबलू बाळू बिरांजे यांच्यासह एका विधी संघर्षित मुलाचा समावेश आहे. गँगमधील सराईतांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, जुगार, बेकायदा शस्त्रे बाळगून दहशत माजविल्याप्रकरणी 14 दखलपात्र गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे.

12 गुन्हेगार ‘रडार’वर!

विचारेमाळसह परिसरात गुंडगिरी करून दहशत माजविणार्‍या आणखी दोन टोळ्यांतील 12 साथीदारांवर लवकरच ‘मोका’अंतर्गत कारवाई शक्य आहे, असेही वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले. दीड महिन्यात तीन संघटित टोळ्यांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई झाल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

टोळीत सहभागासाठी कुटुंबीयांवर दहशत

टोळीतील साथीदारांनी परिसरात अलीकडच्या काळात मोठी दहशत निर्माण केली होती. तक्रारदार काळू बसाण्णा कोळी आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले होते. कोळी यांच्या मुलाने आपल्या टोळीत सहभागी व्हावे, यासाठी गुंडांकडून तगादा सुरू होता. त्याला रस्त्यात अडवून शिवीगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पत्नी, मुलगीसह भाचीला मारहाण झाली होती.

पोलिस निरीक्षक राजेश गवळी, सहायक निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी टोळीविरुद्ध ‘मोका’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव बलकवडे यांच्याकडे दाखल केला होता. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी त्यावर शिक्कामोर्तब केले.

Back to top button