Goa Ganeshotsav : बांबूच्या किसुळीपासून बनला बाप्पा | पुढारी

Goa Ganeshotsav : बांबूच्या किसुळीपासून बनला बाप्पा

वाळपई; पुढारी वृत्तसेवा : गेल्या १६ वर्षांपासून सातत्याने पर्यावरणपूरक गणेश बाप्पाची मूर्ती तयार करण्यासाठी विशेष कष्ट घेणारे भुईपाल येथील सूर्यकांत गावकर यांनी यंदा बांबूच्या किसुळपासून गणेश मूर्ती तयार केली आहे. उभ्या गोमंतकामध्ये निसर्गप्रेमी व पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती साकार करण्याच्या या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली एक वेगळी अशी प्रतिमा निर्माण केलेली आहे.  दरवर्षी ते पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची मूर्ती तयार करीत असतात. यंदा त्यांनी बांबूच्या किसुळपासून मूर्ती तयार करण्यावर विशेष भर दिला. (Goa Ganeshotsav )

सत्तरी तालुक्यातील भुईपाल येथील सूर्यकांत गावकर हे निस्सीम निसर्गप्रेमी आहेत. निसर्गाची ओळख व भ्रमंती करणे हा त्यांचा ध्यास आहे. गणेश चतुर्थीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती तयार करून पर्यावरण रक्षणाची प्रचिती आणण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत असतात. दरवर्षी ते वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करतात. गेल्या १६ वर्षांपासून त्यांचा हा प्रयोग सुरू आहे. यंदा मात्र त्यांनी बांबूच्या किसुळपासून मूर्ती तयार केलेली आहे. सदर मूर्ती ६ फूट उंचीची असून त्याला पूर्णपणे किसूळचा वापर करण्यात आलेला आहे. (Goa Ganeshotsav )

निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या बांबू यांच्या किसुळपासून ही मूर्ती तयार केलेली आहे. यामुळे ही मूर्ती अत्यंत आकर्षक वाटते. ही मूर्ती पूर्णपणे पर्यावरण स्वरूपाची असून मूर्ती तयार करण्यासाठी गेल्या जवळपास दीड महिन्यापासून काम सुरू केले होते. यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडून सहकार्य प्राप्त झाले. यामुळे एक आकर्षक स्वरूपाची पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यासाठी आपण यशस्वी ठरलो असे यावेळी गावकर यांनी सांगितले. (Goa Ganeshotsav )

Back to top button