कोल्हापूर : पर्यटकांना बंदी, मग नौकाविहार कसा चालणार? | पुढारी

कोल्हापूर : पर्यटकांना बंदी, मग नौकाविहार कसा चालणार?

राशिवडे, पुढारी वृत्तसेवा : निसर्गाच्या कोंदणात वसलेल्या राधानगरी अभयारण्य, राधानगरी धरण, राऊतवाडी धबधबा आदी पर्यटनस्थळे पर्यटकांना भुरळ घालत असतात. राधानगरी धरणाला सुरक्षा म्हणून गेली अनेक वर्षे पर्यटकांना धरणावर जाण्यास बंदी घालण्यात आली असताना आता याच धरणाच्या जलाशयामध्ये पर्यटकांसाठी नौकाविहार सुरु करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. धरणावर पर्यटकांना बंदी आणि थेट जलाशयामध्ये नौकाविहारसाठी प्रवेश हे कितपत सुरक्षित आहे? हा प्रश्न निर्माण होत आहे. तर सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅकवाॅटर परिसरात नौकाविहारसाठी चाचपणी महत्वाची आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून धरणाच्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिले. विहिरी, तलाव, छोटे बंधारे अशा अनेक योजनांचा धडाका लावला. राधानगरी धरण म्हणजे या प्रयत्नांच्या मालिकेतील मुकुटमणी, ऐतिहासिक पुरावा आहे. एका छोट्या संस्थानाच्या बचतीमधून इ. स. १९०७ मध्ये शाहू महाराजांनी राधानगरी धरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी धरणाची योजना पुढे आणली आणि हेच धरण जिल्ह्याची तहान भागवू लागले.

राधानगरी तालुक्याची ओळख धरणांचा तालुका अशी वेगळीच आहे. दहा, पंधरा वर्षापूर्वी या धरणाची रेकी झाली होती, हा अतिरेकी चकमकीत ठार झाल्यानंतर त्याने राधानगरी धरणाची रेकी केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर राधानगरी धरणावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली ती आजही कायम आहे. याठिकाणी कायमस्वरुपी पोलिस बंदोबस्त आहे.

साहजिकच या धरणाला अतिरेकी, समाजविघातक व्यक्तिंकडून धोका असल्याने बंदोबस्त कायम असताना पर्यटनाला चालना देण्यासाठी याच धरणाच्या जलाशयामध्ये नौकाविहार सुरू करणे धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे?तसेच या धरणातील पाण्याचा पिण्यासाठी जिल्ह्याला पुरवठा होतो. नौकाविहारमुळे पाणीही दुषित होईल तर प्रशासनावरही ताण पडेल. पर्यटनाच्या दृष्टीने नौकाविहार सुरू करायचा असेल तर धरणातीलच बॅकवाॅटर परिसरामध्ये त्याबाबत चाचपणी करणे योग्य ठरेल. मुळातच धरणावर पर्यटकांना बंदी असताना याच जलाशयामध्ये नौकाविहार कितपत योग्य आहे? हा सुध्दा विचार होणे महत्वाचे आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button