जुन्या संसदेत PM मोदींच्या निरोपाच्‍या भाषणातील ठळक ९ मुद्दे जाणून घ्‍या | पुढारी

जुन्या संसदेत PM मोदींच्या निरोपाच्‍या भाषणातील ठळक ९ मुद्दे जाणून घ्‍या

नवी दिल्‍ली, पुढारी वृत्तसेवा : मावळत्या संसदेची इमारतीमध्ये अनेक उत्तम संसदीय परंपरांचे सृजन येथे झाले आहे. त्यामुळे नव्या संसदेत स्थलांतर होणार असले तरी जुने संसद भवन नव्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. भारतीयांच्या नसानसात लोकशाही कशी भिनली आहे हे जुने संसद भवन जगाला दाखवेल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (दि.१७) लोकसभेमध्ये जुन्या संसदेला निरोप दिला. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने ७५ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीचा आढावा घेताना पंतप्रधान मोदींनी, वर्तमान खासदारांना इतिहास आणि भविष्यातील दुवा बनण्याचे भाग्य लाभले आहे, असेही नमूद केले. ( PM Modi last speech in old parliament )

संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. मसुदा समिती पासून सुरू झालेल्या ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासावर लोकसभेमध्ये चर्चा झाली. या चर्चेला प्रारंभ होण्याआधी लोकसभेमध्ये सुरवातीला काही काळ गोंधळ झाला. मात्र गोंधळानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्तक्षेपाने लगेच वातावरण शांत झाले. महिला आरक्षण विधेयक मंजुरीची मागणी करणारे फलक तृणमूल कॉंग्रेसच्या सदस्यांनी झळकावले. तर आंध प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेचा मुद्दा तेलुगू देसम पक्षाने मांडला. यामुळे हा गोंधळ निर्माण झाला होता. लोकसभाध्यक्ष बिर्ला यांनी सुरवातीच्या निवेदनामध्ये उद्यापासून नव्या संसदेत कामकाजाचे स्थलांतर होत असल्याचे सांगताना या इमारतीमध्ये भारतीय लोकशाही नव्या उंचीवर पोहोचेल, असा आशावाद व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींनी घेतला सदनातील ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासाचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जुन्या संसद भवनाला निरोप देताना या सदनातील ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासाचा आढावा घेतला. नव्या संसदेत जाण्याआधी जुन्या संसदेतील ऐतिहासिक प्रेरणादायी क्षणांचे स्मरण केले. आतापर्यंतच्या संसदीय भाषणांमध्ये विरोधकांवर विलक्षण आक्रमकपणे टीका करणाऱ्या पंतप्रधान मोदींचे आजचे उदारमतवादी शैलीचे होते. आपल्या पन्नास मिनिटांच्या भाषणात मोदींनी विरोधकांवर राजकीय हल्ले टाळले. संसदीय परंपरांचा भावूक पद्धतीने उल्लेख करताना मागील ७५ वर्षात पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते अटल वाजपेयी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग यांच्यापर्यंत सर्व पंतप्रधानांच्या संसदीय कारकिर्दीचा मोदींनी धावता आढावा घेतला.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्‍या भाषणात राजीव गांधींच्या पंतप्रधान पदाचा न झालेला उल्लेख, आणीबाणीचा कालखंड, मनमोहनसिंग सरकारच्या काळातील कॅश फॉर वोट प्रकरण तसेच आंध्र प्रदेशचे विभाजन व तेलंगानाच्या निर्मितीनंतरची वाढलेली कटुता यावरून मोदींनी काढलेले चिमटे विरोधकांना विशेषतः कॉंग्रेसला अस्वस्थ करणारे ठरले. जी-२० परिषदेचे यशस्वी आयोजन भारतीयांच्या ७५ वर्षांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम असल्याचे सांगताना पंतप्रधान मोदींनी चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाने जगाला आधुनिकता, विज्ञान, तंत्रज्ञानाशी निगडीत भारताचे सामर्थ्याचे दर्शन घडविल्याचेही प्रतिपादन केले.

पहिल्यांदा संसदेत प्रवेश आपल्यासाठी भावनिक क्षण होता

संसदेतील कामकाजाचा आढावा घेताना मोदी म्हणाले, की जुन्या संसद भवनात वादविवाद, संघर्ष यासारखे कटुगोड अनुभव राहिले आहे. हा सर्वांचा संयुक्त वारसा आहे. स्वतंत्र भारताशी संबंधित अनेक घटना मागील ७५ वर्षात याच सदनात आकाराला आल्या. त्यामुळे खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा संसदेत प्रवेश करताना पायरीवर डोके ठेवून लोकशाहीच्या मंदिराला प्रमाण केला, हा आपल्यासाठी भावनिक क्षण होता, असे मोदी यांनी नमूद केले.

बदलत्या काळात संसदेची रचना बदलली आणि जनसामान्यांच्या आकांक्षा प्रकट करताना दलित आदिवासी, महिला या सर्वांची संख्या संसदेत वाढल्याचा दाखला देताना मोदी म्हणाले, की . सुरवातीपासून आतापर्यंत ७५०० संसद सदस्यांनी संसदीय कामकाजात योगदान दिले आहे. त्यात ६०० महिला खासदारांचा समावेश होता. या ७५ वर्षात सर्वसामान्य भारतीयांचा संसदेवर विश्वास वाढला आहे. हा विश्वास अतूट राहायला हवा, असे प्रतिपादन करताना पंतप्रधान मोदींनी पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग या माजी पंतप्रधानांचा उल्लेख केला. आतापर्यंतच्या सर्व नेत्यांनी देशाला प्रगतीपथावर नेले. त्यांचा गौरव करण्याची ही वेळ असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्‍या भाषणातील ठळक ९ मुद्दे

  • स्वातंत्र्यानंतर भारताबद्दल आणि भारतीय लोकशाही टिकण्याबद्दल अनेकांना शंका होती. परंतु भारताने संपूर्ण जगाला चूक ठरविले.
  • पहिले लोकसभाध्यक्ष मावळणकर यांच्यापासून ते सुमित्रा महाजन, ओम बिर्लांपर्यंत या सर्व पिठासीन अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयांचा आजही दाखला दिला जातो.
  • संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला हा केवळ इमारतीवर नव्हता तर भारताच्या आत्म्यावर, लोकशाहीची जननी असलेल्या संसदेवर होता.
  • संसदेतील बातमी आणि बातमीमधील विशेष बातमी लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांचे आभार. अनेक पत्रकारांनी संसदेच्या वार्तांकनात मोठा काळ घालविला असल्याने हे सदन सोडणे त्यांच्यासठी भावूक क्षण असेल.
  • मावळत्या संसदेत भगतसिंग, बटुकेश्वर दत्त या क्रांतिकारकांनी बॉम्बस्फोटाच्या आवाजाने ब्रिटीश सत्तेची झोप उडवली.
  • याच संसदेत डॉ. आंबेडकरांनी फॅक्टरी कायदा, जलधोरण आणले. तर श्यामाप्रसाद मुखर्जींनी पहिले औद्योगिक धोरण आणले.
  • लालबहादूर शास्त्रींच्या नेतृत्वाखाली १९६५ च्या युद्धातील विजय आणि १९७१ मध्ये इंदिरा गांधींच्या कार्यकाळात बांगलादेश मुक्ती आंदोलन या सदनाने पाहिला. याच सदनाने आणीबाणीच्या काळात लोकशाहीवरील हल्लाही पाहिला.
  • जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम याच सदनाने हटविले. एक देश एक कर (जीएसटी), वन रॅंक वन पेन्शन योजना, आर्थिक आधारावर १० टक्के आरक्षण याच सदनाने मंजूर केले.
  • छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड ही नवी राज्ये अस्तित्वात आली. तेव्हा मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही उत्सव साजरा झाला. पण आंध्रपदेशचे विभाजन आणि तेलंगानाची निर्मिती कटू आठवण ठरली.

Back to top button