रक्तपात उल्लेख अनावधानाने, शब्द टाळता आला असता! | पुढारी

रक्तपात उल्लेख अनावधानाने, शब्द टाळता आला असता!

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात झालेल्या दूधगंगा काठावरील शेतकर्‍यांच्या बैठकीत रक्तपातासारखा शब्द आपल्याकडून अनावधानाने गेला. तो शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, असे पत्रक वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

लोकभावनांचा उद्रेक पाहता इचलकरंजीला दूधगंगेतून पाणी मिळणे अशक्य असल्याने इचलकरंजी समन्वय समितीने कृष्णेतून पाण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी सहकार्य करू, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. दूधगंगेतून यापूर्वी कमांड एरिया सोडून अनेक गावांना पाणी दिल्यामुळे तसेच काळम्मवाडी धरणाला लागलेल्या गळतीमुळे भविष्यात तीव— पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने हक्काचे पाणी आम्हाला मिळणार नाही, अशी तीव्र भावना दूधगंगा काठावरील गावांमध्ये वाढीस लागली आहे. यासंदर्भात आपण खा. संजय मंडलिक आणि आ. राजेंद्र पाटील -यड्रावकर यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. यावेळी त्यांना या योजनेसंदर्भात बैठक घेण्यापूर्वी इचलकरंजी शहरासाठी झालेल्या सर्व योजनांचा आढावा घ्यावा. त्यांचे सोशल ऑडिट करा आणि मगच बैठक घ्यावी, अशी विनंती करणार आहे.

आतापर्यंत इचलकरंजी शहरासाठी अनेक पाणी योजना झाल्या. कृष्णा नदीवरून मजरेवाडी येथून पाणी योजनाही झाली आहे. इचलकरंजीतील नागरिक आपलेच आहेत. त्यांना शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु, ती योजना आता कृष्णा नदीतून मजरेवाडीवरूनच झाली पाहिजे. त्यासाठी सहकार्य करू. निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घालू, परंतु दूधगंगेकडे येण्याचे त्यांनी धाडस करू नये. समन्वय समितीने जी सामंजस्याची भूमिका यामध्ये घेतली आहे, ती स्तुत्य आहे. तशीच भूमिका घेऊन योजना कृष्णा नदीतून मजरेवाडीवरूनच कशी होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असेही या पत्रकात नमूद केले आहे.

Back to top button