करुळ घाटात दरीत डंपर कोसळून चालकाचा मृत्यू | पुढारी

करुळ घाटात दरीत डंपर कोसळून चालकाचा मृत्यू

गगनबावडा, पुढारी वृत्तसेवा : करुळ घाटात वाळूने भरलेला डंपर दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक सुहास महादेव चौगुले (वय 35, रा. उचगाव, ता. करवीर) याचा मृत्यू झाला. डंपरखाली अडकलेला मृतदेह करुळ येथील सह्याद्री जीवरक्षक व पोलिसांनी जमिनीत खोल खड्डा खोदत बाहेर काढला.

कणकवलीहून कोल्हापूरकडे वाळूने भरलेला डंपर पहाटे करुळमार्गे जात होता. करुळ चेक नाक्यापासून पुढे तीन किमी अंतरावर चालकाचा ताबा सुटून डंपर उजव्या बाजूने अंदाजे 100 फूट दरीत कोसळला. डंपरखाली अडकल्याने चालकाचा मृत्यू झाला. नाक्यावर ड्युटीवर असलेले पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे व पोलिस उपनिरीक्षक अमोल पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी व करुळ सह्याद्री जीव रक्षकचे अध्यक्ष हेमंत पाटील, विजय पवार, विजय सावंत, देवेंद्र पवार, अमर शिंदे, राजेंद्र पवार, राजेंद्र वारंग, आनंद माळकर, संजय पवार व इतर रक्षक अपघातस्थळी दाखल झाले. रक्षकांनी डंपरच्या खाली जमिनीत खोल खड्डा मारला. तीन फूट खोल खड्डा मारल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. चौगुले याचे नातेवाईक वैभववाडीत दाखल झाले. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास वैभववाडी पोलिस करत आहे.

Back to top button