MLA P N Patil | जनसागराच्या साक्षीने पी. एन. पाटील यांना अखेरचा निरोप | पुढारी

MLA P N Patil | जनसागराच्या साक्षीने पी. एन. पाटील यांना अखेरचा निरोप

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरचे राजकीय व सहकारी क्षेत्रावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे करवीरचे आमदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व उद्योगपती पी. एन. पाटील सडोलीकर (वय 71) यांचे (MLA P N Patil) गुरुवारी पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार व शेती क्षेत्रातील जाणते नेतृत्व व पश्चिम महाराष्ट्रातील मोठा काँग्रेस नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. कार्यकर्त्यांसाठी अहोरात्र उपलब्ध असणारे आमदार म्हणून ख्याती असलेल्या पी. एन. पाटील यांच्या निधनाने कार्यकर्त्यांचा आधारवडच कोसळला आहे. संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. सडोली खालसा (ता. करवीर) या त्यांच्या मूळ गावी संपूर्ण शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

पी. एन. पाटील हे रविवारी घरी बाथरूममध्ये चक्कर येऊन पडले होते. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रियाही करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावरील उपचारासाठी त्यांचे मित्र मुंबईचे डॉ. सुहास बराले
यांना विशेष विमानाने पाचारण करण्यात आले. सोमवारी सकाळी त्यांचे स्कॅनिंग करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटलकडून तसेच त्यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. हॉस्पिटलमध्ये गर्दी न करण्याचे आवाहनही करण्यात आले. मात्र उपचारांना दाद न देेता त्यांची प्रकृती खालावली. त्यांना सोमवारी मुंबईला एअर अ‍ॅम्ब्युलन्सने नेण्याची तयारीही करण्यात आली होती. मात्र त्यांची प्रकृती जोवर स्थिर होत नाही तोवर त्यांना हलविणे जोखमीचे असल्याने ही शक्यता मागे पडली. गुरुवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, श्रीपतरावदादा बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील, तसेच मुलगी टिना, जावई असा मोठा परिवार आहे.

सडोली खालसा (ता. करवीर) येथे गुरुवारी दुपारी अडीच वाजता संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव त्यांच्या राजारामपुरीतील निवासस्थानी, काँग्रेस कमिटी तसेच फुलेवाडी येथील गॅरेजवर अंत्यदर्शनासाठी काही काळ ठेवण्यात आले. काँग्रेस कमिटीत त्यांच्या पार्थिवावर काँग्रेसचा ध्वज घालण्यात आला.

करवीर हे कार्यक्षेत्र

करवीर हेच कार्यक्षेत्र असलेल्या पी. एन. पाटील यांचा जन्म 6 जानेवारी 1953 रोजी दिंडनेर्ली (ता. करवीर) येथे आजोळी झाला. शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या पी. एन. पाटील यांच्यावर त्यांचे वडील निवृत्ती रामजी पाटील, आई सावित्री यांनी संस्कार केले. आपल्या घरातूनच त्यांनी सामाजिक कार्याचा वारसा घेतला. ते सडोली खालसा गावचे असल्याने सर्वत्र त्यांना सडोलीकर या नावानेच ओळखत. गावातील शाळेतच त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले.

देशभर सडोलीकर ब्रँड फेमस

घरच्या शेतीच्या जोरावर त्यांनी अर्थमूव्हिंग क्षेत्रात भरारी घेतली. आर. डी. पाटील यांच्याकडेे उमेदवारी केल्यानंतर त्यांनी अर्थमूव्हिंगच्या क्षेत्रात आपल्या साम्राजाचा दबदबा देशभर निर्माण केला. देशभरात कुठेही गेले तरी अर्थमूव्हिंगची मशिनरी म्हणजे कोल्हापूरचे सडोलीकर हा खास कोल्हापुरी ब्रँड सडोलीकर कुटुंबाने निर्माण केला. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले पी. एन. पाटील हे स्वत: अर्थमूव्हिंगची मशिनरी चालविण्यापासून बिघडलेली मशिनरी पूर्ववत करण्यापर्यंत सर्व छोट्या-मोठ्या गोष्टी ते स्वत:हून वेळप्रसंगी करत. या उद्योगतील सखोल ज्ञान व अद्ययावत माहिती त्यांच्याकडे असे. सडोलीला बुलडोझरचे गाव ही प्रतिष्ठा सडोलीकर कुटुंबामुळे मिळाली.
कॉँग्रेसचे निष्ठावंत, सांगरुळचे आमदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्या कन्या जया यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर काही वर्षांतच ते राजकारणात सक्रिय झाले. पराभव पचवून कार्यकर्त्यांना धीर देत जोरकसपणे कार्यकर्त्यांची फळी उभा करत. त्यांनी 2004 साली सांगरुळ मतदारसंघातून विधानसभेत पहिल्यांदा प्रवेश केला, काँग्रेसचे निष्ठावंत पाईक ही पी. एन. यांची राज्यभर ओळख होती. त्यांनी हयातभर काँग्रेसशिवाय दुसरा विचारही केला नाही. 2019 साली मतदारसंघ बदलून करवीर विधानसभा मतदारसंघातून जनतेने त्यांना पुन्हा विधानसभेवर पाठविले.

जिल्हाभर कार्यकर्त्यांचे मोहोळ

विधानसभेतील उपस्थिती आणि मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यातील विकासकामांसाठी ते आग्रही असत. या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळेच मतदारसंघातील गावागावांतच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण केले.

सहकारी संस्थांचे जाळे, कार्यकर्त्यांना ताकद

सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक संस्थांचे जाळे तर विणलेच; त्याचबरोबर या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. अनेक कार्यकर्त्यांना बळ दिले तसेच विविध सहकारी संस्थांमध्ये संचालक म्हणून काम करण्याची संधी देत नव्या नेतृत्वाला संधी दिली.

भोगावतीची सूत्रे नव्या पिढीकडे सोपविली

पी. एन. पाटील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व करत होते. गेली पाच वर्षे कारखान्याचे अध्यक्ष म्हणून साखर उद्योग कठीण कालखंंडातून वाटचाल करत असताना त्यांनी अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत कारखान्याची सूत्रे आपल्या कार्यकर्त्यांकडे सोपवून त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली. याच कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाला त्यांनी उत्तेजन दिले.

जिल्हा बँकेतून शेतकर्‍यांना सवलतीने पीककर्ज, राज्यातील पहिला निर्णय

शेतकर्‍यांची जननी समजल्या जाणार्‍या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून 1985 साली त्यांनी सहकार क्षेत्रात दमदार वाटचाल सुरू केली. 1990 ते 1995 या काळात सलग पाच वर्षे या बँकेचे अध्यक्ष राहिले. याच काळात त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. जिल्ह्यातील पाच लाख शेतकर्‍यांना केवळ 7 टक्के व्याजाने पीक कर्ज देण्याचा राज्यातील पहिला ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला.

डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडून कौतुक

एवढ्या कमी व्याजाने पीक कर्ज देणारी एकमेव बँक असा लौकिक या बँकेला मिळाला. माजी पंतप्रधान व तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या या कामाचे पत्र पाठवून कौतुक केले होते. पीक कर्जाशिवाय शेतकर्‍यांच्या आणखीही आर्थिक गरजा भागविण्यासाठी कर्ज वितरणात सुधारणा करून त्यांनी शेतकर्‍यांना दुचाकी वाहनांसह गृहोपयोगी वस्तू घेण्यासाठी कर्ज देण्याचा निर्णय घेतला. गेली 38 वर्षे ते या बँकेचे संचालक म्हणून काम पाहात होते.

सलग तीस वर्षे राजीव दौड

बंद पडलेल्या करवीर तालुका खरेदी-विक्री संघाचे पुनरुज्जीवन त्यांनी केले. तालुक्याचा निवृत्ती तालुका सहकारी संघ स्थापन करून त्यांनी शेतकर्‍यांच्या गरजा पूर्ण करण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले. मतदारसंघातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांनी राजीवजी सहकारी सूत गिरणीची स्थापना केली. दिंडनेर्ली येथे सूत गिरणीची उभारणी केली. येथे तयार होणार्‍या सुतापैकी 52 टक्के सुताची निर्यात होते. राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी कोल्हापूर ते दिंडनेर्ली अशी राजीव दौड व त्याला जोडूनच शेतकरी मेळावा सुरू केला. गेली 30 वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या या उपक्रमात अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. आता याला जोडूनच राष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या व्यक्तिमत्त्वास एक लाख रुपयांचा राजीव गांधी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाते.

सूत गिरणी व बँकेची स्थापना

आपले सासरे श्रीपतराव बोंद्रे यांच्या नावाने त्यांनी श्रीपतरावदादा सहकारी बँकेची स्थापना केली. तरुणांना रोजगार व गरजूंना अर्थपुरवठा असे सूत्र ठेवत त्यांनी या बँकेची सूत्रेही आपल्या पुढच्या पिढीकडे सोपविली आहेत. श्रीपतराव बोंद्रे यांचा स्टेशन रोडवर पूर्णाकृती पुतळा उभारून त्यांचे स्मारक तयार केले.

राज्य वीज मंडळाचे सदस्य

पी. एन. पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन 2003 साली महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे संचालक म्हणून काम करण्याची संधी त्यांना सरकारने दिली. या माध्यमातून त्यांनी शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्याचे काम केले.

कठीण काळात काँग्रेसची नौका सावरली

सडोली खालसा गावच्या काँग्रेस कमिटीचे क्रियाशील सदस्य म्हणून सुरू झालेली त्यांची कारकीर्द दोन वेळा आमदार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य अशा चढत्या क्रमाने विस्तारली. शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यामुळे काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्या काळात 20 मे 1999 रोजी पक्षश्रेष्ठींनी अत्यंत कठीण काळात पी. एन. पाटील यांच्याकडे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली. त्यावेळी तत्कालीन जिल्हा व शहर काँग्रेस अध्यक्षांसह काही पदाधिकारी शरद पवार यांच्यासमवेत गेले होते. पण न डगमगता पी. एन. पाटील यांनी कठीण काळात काँग्रेसची नौका सावरली.

राजीव गांधी यांचा पुतळा उभारला

राजीव गांधी हेच आपले नेते, हाच आपला पक्ष व हाच आमचा झेंडा, असे सतत सांगणार्‍या पी. एन. पाटील यांनी कोल्हापुरात राजीव गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला. या पुतळ्याचे उद्घाटन सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे त्यांनी यशस्वी नियोजन केले होते. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून त्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आले होते. त्याचे नेटके संयोजन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर मोर्चे, आंदोलने

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर पी. एन. पाटील कमालीचे आक्रमक होते. शेतकर्‍यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी हजारो शेतकर्‍यांचे मोर्चे काढले. सरकारकडे प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करून घेतली. शेतकर्‍यांवरील वीज दरवाढीविरोधात काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व त्यांनी केले.

नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांच्या अनुदानासाठी आग्रही भूमिका

अलीकडेच सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र ज्या शेतकर्‍यांनी नियमित कर्जफेड केली होती, त्यांना याचा फायदा मिळत नव्हता. हे लक्षात येताच त्यांनी सरकारकडे हा मुद्दा मांडला. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांवर यामुळे अन्याय होत असून त्यांना कर्जमाफीच्या लाभापोटी अनुदान देण्याची मागणी लावून धरली. अखेर सरकारने नियमित कर्जफेड केलेल्या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले. काळम्मावाडी धरणाची गळती काढण्याचा प्रश्न त्यांनीच उपस्थित केला. त्यानंतर सरकारने या कामासाठी 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

निर्भीड, धाडसी अन् स्पष्टवक्ते

पी. एन. पाटील हे निर्भीड व स्पष्टवक्ते होते. अखंडपणे कष्ट घेण्याची तयारी, कणखरपणे ‘नाही’ म्हणण्याची तयारी यामुळे त्यांच्याभोवती कायम हे वलय राहिले. त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळे ते अप्रिय झाले नाहीत. उलट ठामपणामुळे त्यांच्या भोवतीचा मित्रपरिवार वाढला. विश्वासू सहकारी अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली व जपलीही.

अशी भेट… अशा आठवणी

कोल्हापूर लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान झाले. पी. एन. पाटील यांनी त्यांच्या गावी मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी जनतेला झालेले त्यांचे हे शेवटचेच दर्शन. त्यापूर्वी भोगावती कारखान्यात सुमारे चाळीस वर्षांचा संघर्ष मिटवून त्यांनी आपले राजकीय विरोधक संपतराव पवार-पाटील यांच्याशी युती केली होती. मतदानावेळी त्यांची व संपतराव पवार-पाटील यांची केंद्रावर भेट झाली. त्यांनी हस्तांदोलन केले. त्यापूर्वी एका लग्न समारंभात पी. एन. व संपतराव पवार यांची भेट झाली होती. आता या केवळ आठवणीच.

Back to top button