कोल्हापूर : … अन् रुग्णालयाच्या भिंतीही गहिवरल्या | पुढारी

कोल्हापूर : ... अन् रुग्णालयाच्या भिंतीही गहिवरल्या

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार दिवसांपासून कार्यकर्ते दिवस-रात्र आपला नेता बरा होईल आणि त्यांचे पुन्हा दर्शन होईल, या आशेने रुग्णालयाच्या दारात तळ ठोकून होते. परंतु, नियतीला हे मान्य नव्हते. पहाटे आ. पी. एन. पाटील यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव दवाखान्यातून बाहेर काढताना कार्यकर्त्यांनी फोडलेल्या टाहोनी दवाखान्याच्या भिंतीही गहिवरल्या.

अनेक कार्यकर्ते ओक्साबोक्सी एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होते. शांत राहा म्हणून कोणी कोणाला सांगायचे, सगळ्यांचेच डोळे पाण्याने डबडबले होते. कसेतरी या कार्यकर्त्यांना आवरत अ‍ॅम्ब्युलन्सला वाट करून दिली आणि आ. पाटील यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. आ. पाटील यांना रुग्णालयामध्ये रविवारी दाखल करण्यात आले. त्या दिवसापासून कार्यकर्ते रुग्णालयाच्या दारात तळ ठोकून होते. आपला नेता बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत होते, साकडे घालत होते. सोमवारी तर रुग्णालयासमोर हजारो कार्यकर्ते जमल्यामुळे त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली. राजेश पाटील, राहुल पाटील कार्यकर्त्यांना गर्दी करू नका म्हणून सांगत होते, तरीही आ. पाटील यांच्याबद्दल असलेले प्रेम आणि आदर यामुळे कार्यकर्ते कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
अनेक कार्यकर्ते दिवस-रात्र आपल्या नेत्यासाठी धावा करत होते. रुग्णालयाकडून रोज सकाळी, संध्याकाळी पाटील यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत महिती देण्यात येत होती. माहिती देण्यासाठी डॉक्टर बाहेर आले की, कार्यकर्तेही जमायचे. साहेबांच्या तब्येतीत सुधारणा आहे, असे डॉक्टर सांगतील अशी त्यांची अपेक्षा असायची. परंतु, प्रत्येकवेळी ‘गंभीर’ शब्द ऐकून कार्यकर्ते नाराज व्हायचे.

आ. पाटील यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्यामुळे कोणाला सोडले जात नव्हते. त्यामुळे साहेब बरे होऊन बाहेर येतील या आशेने त्यांना पाहण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये तळ ठोकला होता. परंतु, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. डॉक्टरांचे प्रयत्नही कामी न आल्याने गुरुवारी पहाटे पाटील यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. यावेळी सर्व स्तब्ध झाले. जमलेल्या गर्दीनेही शांतता अनुभवली.

कार्यकर्ते त्यांच्या पार्थिवाची दर्शनासाठी वाट पाहू लागले. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांनी सर्व कार्यकर्त्यांना निवासस्थानी जाण्याचे आवाहन केले. परंतु, कार्यकर्त्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शवागृहातून पार्थिव अ‍ॅम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आले. हे समजताच कार्यकर्ते अ‍ॅम्ब्युलन्सच्या समोर उभा राहिले. आ. पाटील यांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी टाहो फोडला. प्रत्येकजण एकमेकाच्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडत होता. आ. पाटील यांच्यावरील कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून रुग्णालयामधील कर्मचार्‍यांच्याही डोळ्यांत पाणी आले. कार्यकर्त्यांना आवरणे अशक्य होऊ लागले. अखेर त्यांची समजूत काढत अ‍ॅम्ब्युलन्सला मार्ग मोकळा करून देत सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी पार्थिव घेऊन अ‍ॅम्ब्युलन्स राजारामपुरीतील निवासस्थानाकडे रवाना झाली.

काँग्रेस कमिटीत अंत्यदर्शनासाठी गर्दी

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आ. पाटील यांचे पार्थिव काँग्रेस कमिटीमध्ये आणण्यात आले. याठिकाणी फुलाने सजविलेल्या टेबलवर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. ‘आ. पी. एन. पाटील साहेब अमर रहे’, ‘जब तक सूरज, चाँद रहेगा, पी. एन. पाटील नाम रहेगा’ आशा घोषणा देण्यात येत होत्या. आ. पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

शाहू महराज, आ. जयश्री जाधव, आ. ऋतुराज पाटील, आ. काका पाटील, माजी खा. जयवंतराव आवळे, प्रतीक पाटील, संभाजीराजे, माजी आमदार दिनकरराव जाधव, मालोजीराजे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. दिलीप पवार, शिरोळचे गणपतराव पाटील, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सचिव सुवर्णा तळेकर, ‘गोकुळ’ संचालक विश्वास पाटील, बाबासाहेब चौगुले, अंबरिशसिंह घाटगे, डॉ. चेतन नरके, बयाजी शेळके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, बाजार समिती सभापती भारत पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महिला शहराध्यक्ष संध्या घोटणे, महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, काँग्रेसचे करवीर तालुका अध्यक्ष शंकर पाटील-शिंगणापूरकर, निवृत्त पोलिस अधिकारी आर. आर. पाटील, शशांक बावचकर, उदयसिंह पाटील-कौलवकर, विक्रम जरग, संजय मोहिते, अर्जुन माने, तौफिक मुल्लांनी, सागर यवलुजे, राजाराम गायकवाड, विनायक फाळके, मधुकर रामाणे, माणिक मंडलिक, सुनील मोदी, केर्ले सरपंच सचिन चौगले, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, माजी सदस्य भगवान पाटील, युवक काँग्रेसचे उदय पवार, रामराजे कुपेकर, भारती पवार, लीला धुमाळ, संजय वाईकर, प्राचार्य महादेव नरके, इंद्रजित सलगर, राजेंद्र सूर्यवंशी, रामराजे कुपेकर. ‘हिंद केसरी’ विनोद चौगुले, ‘महाराष्ट्र केसरी’ विष्णू जोशीलकर, आनंदराव माने, सुलोचना नायकवडे, लालासाहेब गायकवाड, प्रसाद कामत, राजेश लाटकर, दिलीप पोवार, सत्यजित जाधव, रहीम सनदी, काका पाटील, संजय मोहिते, अशपाक आजरेकर, अशोक जाधव, रमेश पुरेकर, शिवराज जगदाळे, बाळासाहेब सरनाईक, बबन राणगे, संभाजी पाटील-कुडित्रे, बी. के. डोंगळे, सुनील देसाई, विक्रांत पाटील-किणीकर, हर्षल सुर्वे, अंजना रेडेकर, दीपा पाटील, सुधाकर साळोखे, प्रा. किसन कुराडे, शिवाजी कवठेकर आदींनी आ. पी. एन. पाटील यांचे काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शन घेतले.

अखेरपर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ

आ. पी. एन. पाटील अखेरपर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. दुसर्‍या पक्षाचा किंवा काँग्रेस पक्ष विरोधी भूमिका घेण्याचा विचार कधीही त्यांच्या मनात आला नाही. अशा या नेत्याचा अखेरचा प्रवासदेखील काँग्रेसच्या तिरंगा झेंड्यात झाला. पी. एन. पाटील जवळपास दोन दशके काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांचे पार्थिव काँग्रेस कमिटीत आणल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. आ. पाटील यांचे पार्थिव काँग्रेस कमिटीमध्ये एक तास ठेवण्यात येणार होते. त्यामुळे अंत्यदर्शनासाठी सर्व पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सकाळपासून काँग्रेस कमिटीत गर्दी केली होती. अकरा वाजले तरी अंत्यदर्शनासाठीची गर्दी कमी होत नव्हती. अकरा वाजून पाच मिनिटांनी काँग्रेस कमिटीतून पाटील यांचे पार्थिव हलविण्यात आले. त्यामुळे काही नागरिकांना अंत्यदर्शनासाठी फुलेवाडी येथील त्यांच्या गॅरेजवर जायला लागले.

Back to top button