राज्यात कोण कोणाकडे हेच समजेना : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

राज्यात कोण कोणाकडे हेच समजेना : पृथ्वीराज चव्हाण

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात सामना करून शकत नाही, लोकसभेला अपेक्षित यश मिळणार नाही, याची जाणीव झाल्यानेच भाजपने ‘ऑपरेशन कमळ’ राबवण्यास सुरुवात केली. त्यातूनच पहिला शिवसेनेवर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी दुसरा हल्ला राष्ट्रवादीवर केला, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर केली. या फुटीनंतर राज्यात नेमके कोण कोणाकडे गेले हेच कळेना झाले आहे, असेही ते म्हणाले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हातकणंगले, शिरोळ आणि इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील पदाधिकार्‍यांची मते जाणून घेण्यासाठी ते शनिवारी इचलकरंजीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

चव्हाण यांनी मोदी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. मणिपूरमध्ये दंगली उसळल्या आहेत. मणिपूर जळत आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. मात्र या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास ठरावावरील चर्चेत फारसे बोलले नाहीत. दोन तासांच्या भाषणात केवळ दोन मिनिटांत मणिपूरवर भाष्य केले. गुजरातमध्ये दंगली झाल्या होत्या. त्यावेळी मोदी मुख्यमंत्री होते. त्यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे गुजरातमध्ये गेले होते. छावण्यांना भेटी दिल्या. लोकांचे सांत्वन केले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना राजधर्म पाळण्याचा आदेश दिला होता. मात्र आताचे पंतप्रधान मणिपूरच्या विषयावर बोलायलाही तयार नाहीत.

लोकांसमोर बेरोजगारी, महागाईचे प्रश्न आहेत. शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकर्‍यांना उचित मूूल्य मिळत नाही. मात्र सरकारकडे त्यांची उत्तरे नाहीत. मोदींची केवळ घोषणाबाजी, जाहिरातबाजी झाली असली तरी मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षांशी मोदी सरकार तुलना करू शकत नाही. नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था कोसळली. जीएसटीमुळे छोटे उद्योग बंद पडले. मोठ्या प्रमाणात कर्ज काढल्याशिवाय सरकार चालवता येत नाही. कर्ज काढण्याची सीमाही संपली आहे. त्यामुळे आता कुणी कर्ज द्यायलाही तयार नाही, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्सची दहशत

सरकारी उद्योगांची भरमसाट विक्री सुरू आहे. सगळी विमानतळे विकली आहेत. मोठ्या कंपन्या अदानीला देण्याचे सुरू आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. विकास दर थंडावला आहे. त्यामुळे रोजगार मिळत नाही. परिणामी महागाईही कमी होत नाही. कर कमी करा म्हणून आम्ही आक्रोश करीत आहोत. पण कर कमी केल्यास सरकारच चालवता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून लोकांनी आता मोदी सरकारची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सरकार फक्त ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या दहशतीवर चालले असल्याची टीका चव्हाण यांनी केली.

विरोधी पक्ष संपवून एका पक्षाची हुकूमशाही देशात आणण्याचा प्रयत्न भाजपचा सुरू आहे. त्यामुळे 2024 ची लोकसभा अत्यंत महत्त्वाची आहे. त्याची पूर्वतयारी सध्या सुरू आहे. मोदींच्या आघाडीच्या विरोधात इंडिया आघाडीचा एकच उमेदवार उभा राहील. विरोधी पक्षाच्या मतांचे विभाजन टाळल्यास मोदींचा पराभव नक्की आहे. त्यासाठी इंडिया आघाडीची बैठक होणार आहेे. सध्या 28 पक्ष आहेत. आणखी काही पक्ष सहभागी होण्याची शक्यताही त्यांनी यावेळी वर्तवली.

यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजूबाबा आवळे, प्रदेश सचिव शशांक बावचकर, शहराध्यक्ष संजय कांबळे, माजी नगरसेवक राहुल खंजिरे, बाबासाहेब कोतवाल, युवराज शिंगाडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

‘बीआरएस’ ही भाजपची बी टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांचे 16 आमदार निलंबित होतील. उच्च न्यायालयाने याबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार 90 दिवसांत त्यांनी हा निकाल देणे अपेक्षित होते. त्यामुळेच ऑगस्टमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज आपण व्यक्त केला होता. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची ‘बीआरएस’ ही भाजपची बी टीम असल्याची टीका करत त्यांनी महाराष्ट्रात उगीच उठाठेव करू नये, त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यांनी यावेळी तेलंगणात काय होणार याकडे लक्ष द्यावे, असा टोला चव्हाण यांनी लगावला.

Back to top button