

पुढारी ऑनलाईन : दाजीपूर – राधानगरी अभयारण्याला जोडून असलेला गगनबावडा घाटमाथा परिसर हा पश्चिम घाटाचा (Western Ghats) एक महत्त्वपूर्ण भाग आहे. पश्चिम घाटातील या परिसराची स्वतंत्र अशी परिसंस्था असल्याचे निसर्गतज्ज्ञांनी बऱ्याचदा अधोरेखित केले आहे. याठिकाणी निरनिराळ्या वनस्पती, फुलांच्या प्रजातींप्रमाणेच येथे सरिसृप वर्गातील प्राण्यांच्याही खूप प्रजाती आहेत. दरम्यान गगनबावडा (Kolhapur) येथील या परिसरात सापाची एक वेगळी प्रजाती आढळून आली आहे, अशी माहिती निसर्गप्रेमी आणि अभ्यासक डॉ. अमित पाटील यांनी दिली आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित पाटील यांना निसर्ग भटकंती आणि अभ्यासाची आवड. त्यामुळे ते गगनबावडा परिसरात आढळणाऱ्या सापांचा शोध घेऊन त्यांच्या नोंदी करत असतात. दरम्यान, बुधवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा-बाराच्या सुमारास अमित यांना ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात तस्कर साप (Trinket) आढळून आला. हा अनोखा साप असल्याने त्यांनी राधानगरी येथील सम्राट केरकर यांच्या माध्यमातून सर्पतज्ज्ञ डॉ. वरद गिरी व कर्नाटकातील प्रसिद्ध प्राणिशास्त्रज्ञ डॉ. दीपक देशपांडे यांच्याशी फोनच्या माध्यमातून संपर्क साधला. तसेच याविषयी माहिती घेतली. तेव्हा तो दुर्मिळ (Kolhapur) असल्याचे समजले.
हा दुर्मीळ अनोखा साप ४ ते ४.५ फूट लांबीचा आणि १-१.२५ इंच जाडीचा पूर्ण वाढ झालेला असून, त्याला पकडण्यात आला आहे. मात्र नेहमी आढळणाऱ्या सामान्य तस्कर (Common Trinket) सापापेक्षा या सापाचा रंग जास्त गडद व डोक्यावरील पट्टे वेगळे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढल्यामुळे रोहित यांनी इंटरनेवरून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून फारसे काही हाती लागले नाही. त्यानंतर त्यांनी सर्पतज्ज्ञ डॉ. वरद गिरी व कर्नाटकातील प्रसिद्ध प्राणिशास्त्रज्ञ डॉ. दीपक देशपांडे यांच्याशी फोनच्या माध्यमातून संपर्क करत, याविषयी अधिक माहिती घेतली. डॉ. देशपांडे यांनी त्यांना काही संदर्भ पाठवून पुढील अभ्यास केला. शिवाय डॉ. गिरी यांनी डॉ. अमित यांनी पाठविलेल्या विविध फोटोंच्या आधारे हा 'सामान्य तस्कर' साप नसून, तो 'मॉण्टेनचा तस्कर' साप (Montane's Trinket) असल्याचे सांगितले. तसेच हा अतिशय दुर्मीळ व सहजासहजी न आढळणारा साप असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
हा सामान्य तस्कर साप नसून तो 'मॉण्टेनचा तस्कर' साप (Montane's Trinket) असल्याचे तज्ज्ञांच्या मते स्पष्ट झाले आहे. या मॉण्टेन प्रजातीतही डोक्यावरील व अंगावरील पट्ट्यांनुसार सहा प्रकार असून त्यातील नव्याने आढळलेल्या तिसऱ्या उपप्रकारातील हा साप असल्याचे तज्ज्ञांनी कळविले आहे.

तस्कर हा साप अतिशय उजळ रंगाचा असून देखणा असतो. सुमारे ४.५-५ फूट वाढणारा हा साप धोक्याची जाणीव होताच हल्ल्याचा वैशिष्ट्यपूर्ण पवित्रा घेतो आणि नागासारखा असल्याचे भासवतो. हा शक्यतो दाट जंगलात वाळवीच्या बिळांमध्ये राहतो आणि उंदीर, सरडे, पाली, लहान पक्षी यांना खाद्य बनवितो. याला पकडून बंदिस्त जागी ठेवलेले आवडत नाही आणि वारंवार त्रास दिल्यास जोरात चावा घेतो; मात्र हा बिनविषारी साप असून, यापासून माणसाला कोणताही धोका नसतो. मॉण्टेनचा तस्कर साप हा शक्यतो गडद तपकिरी रंगाचा असून त्याच्या डोक्यावरील व अंगावरील पट्ट्यांचा वेगळी संगती हा त्याला सामान्य तस्कर सापापासून विलग करतो.
गगनबावडा परिसर हा केवळ निसर्गसंपन्नच नाही तर विविध प्रकारच्या सापांचेही आगर आहे. डॉ. पाटील यांना गगनबावडा परिसरात मलबार पिट वायपर, बांबू पिट वायपर, बेडॉम्स कॅट स्नेक, फ्रॉर्स्टेन्स कॅट स्नेक, वोल्फ स्नेक, हिरवा नाग म्हणून ओळखला जाणारा ग्रीन किलबॅक, चेकर्ड किलबॅक, बफ स्ट्राईप्ड किलबॅक, खापरखवल्या, नाग, मण्यार, घोणस, फुरसे, धामण अशा बऱ्याच प्रजातींचे साप मोठ्या प्रमाणावर आढळले आहेत. बिनविषारी किंवा विषारी सापांना मारून निसर्गाची ही संपन्न परिसंस्था बिघडवली जाऊ नये यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन डॉ. अमित पाटील यांनी केले आहे.