इचलकरंजी शहर पाकिस्तानात आहे का? : खा. धैर्यशील माने | पुढारी

इचलकरंजी शहर पाकिस्तानात आहे का? : खा. धैर्यशील माने

कोल्हापूर/इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरला थेट पाईपलाईनमधून पाणी दिले जाते, मग इचलकरंजी हे काय पाकिस्तानमधील गाव आहे का, असा सवाल करत इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेली सुळकूड योजनेची अंमलबजावणी करा, असे आवाहन करत याविषयी गैरसमज न करून घेता मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही भूमिका संवेदनशीलपणे समजून घेऊन पाणी द्यावे, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी केले. इचलकरंजी येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेतली. यावेळी सुळकूड योजनेबाबत दोन्ही बाजूंविषयी शासनाला अहवाल देणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

दूधगंगेतून इचलकरंजी शहराला पाणी देण्याला कागल तालुक्यातून विरोध होत आहे. सुळकूड योजनेतून इचलकरंजीकरांनी पाणी मागण्याचे धाडस करू नये, असा इशारा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीत दिला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची सुळकूड योजना अंमलबजावणी कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेत आक्रमक बाजू मांडली.

कृती समितीचे समन्वयक विठ्ठल चोपडे यांनी दूधगंगा योजनेचा प्रवास सांगून इचलकरंजीला पाणी कसे देणे शक्य आहे, हे सांगितले. खा. माने म्हणाले, पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने ते इचलकरंजीला देणे बंधनकारक आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक घेऊन पाठपुरावा केला जाईल.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, कर्नाटकला मंजुरीपेक्षा अधिक पाणी सोडले जाते. त्यामुळे इचलकरंजीला पाणी नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही. पंचगंगा नदी उशाला असताना दूधगंगेतून पाणी का, असा आरोप इचलकरंजीवर केला जातो, मग कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनमधून का पुरवठा होतो? अतिरिक्त पाण्यामुळे शेतीला ते कमी पडणार नाही, तसे झाल्यास मी शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरेन.

माजी आमदार सुरेश हळवणकर म्हणाले, जलसंपदा विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसारच हे पाणी मिळणार आहे. यामुळे इचलकरंजीचा यावर कायदेशीर हक्क आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे म्हणाले, समज-गैरसमज दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन योजना तातडीने मार्गी लावावी. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, जनता दलाचे महासचिव प्रताप होगाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य मदन कारंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, माजी नगरसेवक सागर चाळके, माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके, दत्ता माने, अजित जाधव, राहुल खंजिरे, नितीन जांभळे, महादेव गौड, ध—ुवती दळवाई आदींनीही दूधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणी देण्याबाबतची भूमिका मांडली.

शासनाकडून येणार्‍या मार्गदर्शनानुसार पुढील निर्णय

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका येथील मलनिस्सारणाचे काम लवकरच पूर्ण होईल. दोन वर्षांनंतर पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित सांडपाणी येणार नाही. इचलकरंजीचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. कागल तालुक्याचे त्यावर दुमत नाही. फक्त हे पाणी वारणा, कृष्णा नदीतून कसे घेता येईल याची माहिती त्यांनी दिलेली आहे. जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि इचलकरंजी महापालिका यांच्याकडील सूचनेवर आधारित अभिप्रायाचा सविस्तर अहवाल सरकारला पाठवण्यात येईल. शासनाकडून येणार्‍या मार्गदर्शनानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आजी-माजी खासदार पाण्यासाठी एकत्र

लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या चार वर्षांपासून एकमेकांसमोर उभे ठाकलेले व आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकांवर झाडणारे खासदार माने व माजी खासदार शेट्टी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर आज एकत्र आले. राजकारणामुळे यापूर्वी योजनेचा बळी गेला; मात्र सुळकूड योजना राजकारण बाजूला ठेवून पूर्ण करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

Back to top button