गगनबावडा, राधानगरीत पाऊस कमीच | पुढारी

गगनबावडा, राधानगरीत पाऊस कमीच

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणार्‍या गगनबावडा, राधानगरी या दोन तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरवली की काय, असा प्रश्न पडावा अशी स्थिती 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांत झाली आहे. या दोनच तालुक्यांत नव्हे तर चंदगड, पन्हाळा, शाहूवाडी, आजरा आणि गडहिंग्लज या तालुक्यांतही दोन महिन्यांची सरासरी गाठली नाही. परिणामी जिल्ह्यातही सरासरीपेक्षा 33 टक्के कमीच पाऊस झाला आहे.

एक जून ते 31 जुलै या कालावधीत जिल्ह्यात एकूण 1048.4 मि. मी. पाऊस होता. यावर्षी या दोन महिन्यात जिल्ह्यात 695.6 मि. मी. पाऊस झाला. यामुळे यावर्षी या दोन महिन्यांत जिल्ह्यात सरासरीच्या 66.3 टक्केच पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात या दोन महिन्याच्या कालावधीत सरासरीच्या केवळ 75.5 टक्के पाऊस झाला. यावर्षी गगनबावड्यात 24.4 टक्के कमी पाऊस झाला. राधानगरीत दोन महिन्यांत अवघा 43.4 टक्के पाऊस झाला आहे. या तालुक्यात सुमारे 56.6 टक्के कमी पाऊस झाला आहे.

जुलै महिन्यातील पावसाने सरासरीत थोडी वाढ

जून महिन्यात जिल्ह्यात तब्बल 74.2 टक्के कमी पाऊस झाला होता. जुलै महिन्यात झालेल्या पावसाने सरासरीत थोडी वाढ झाली. जुलै महिन्यात भुदरगड तालुक्यात तब्बल 189.2 टक्के पाऊस झाल. यासह शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, कागल व गडहिंग्लज तालुक्यातही जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक (100 टक्क्याहून जादा) पाऊस झाला. राधानगरी, गगनबावडा आणि चंदगड तालुक्यात जुलै महिन्यातही सरासरी इतका पाऊस झाला नाही. राधानगरीत जुलै महिन्यात सरासरीच्या 54.3 टक्के, गगनबावड्यात 95.6 टक्के तर चंदगड तालुक्यात सरासरीच्या 83.6 टक्के पावसाची नोंद झाली.

भुदरगडमध्ये सर्वाधिक पाऊस

यावर्षी भुदरगड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. या दोन महिन्यांत सरासरीच्या 136 टक्के जादा पाऊस झाला. जुलै महिन्यात तर सरासरीच्या तब्बल 189.2 टक्के जादा पाऊस झाला. जुलै महिन्यात 526.9 मि. मी. पाऊस पडतो. यावर्षी तो 973.7 मि.मी. इतका पडला. जून ते जुलै या कालावधीत एकूण 866.7 मि. मी. पाऊस होतो, यावर्षी या कालावधीत तो 1178.5 मि. मी. इतका झाला.

Back to top button